Join us  

कुलदीपपुढे बांगलादेशची दाणादाण; २७१ धावांनी पिछाडीवर

चौधरी स्टेडियमवर सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसअखेर गुरुवारी यजमानांचे आठ फलंदाज १३३ धावांत माघारी परतले. 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 5:30 AM

Open in App

चटगाव : जवळपास २० महिन्यांनंतर कसोटी खेळत असलेल्या कुलदीप यादवने  फलंदाजीत तळाच्या स्थानावर चुणूक दाखविल्यानंतर बांगलादेशच्या फलंदाजांना आपल्या फिरकीचा हिसका दाखविला. यजमानांना कुलदीपने त्यांच्याच खेळपट्टीवर जाळ्यात अडकविल्याने झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसअखेर गुरुवारी यजमानांचे आठ फलंदाज १३३ धावांत माघारी परतले. 

कुलदीपने चार आणि मोहम्मद सिराजने तीन फलंदाज बाद करताच ८ बाद १०२ अशी अवस्था झाली होती. मेहदी हसन मिराज नाबाद १६ आणि इबादत हुसेन  नाबाद १३ यांनी पडझड रोखली.

 नवव्या गड्यासाठी दोघांनी ३१ धावांची भागीदारी केली. भारताने आपल्या पहिल्या डावात ४०४ धावा केल्यामुळे बांगलादेश संघ अजूनही २७१ धावांनी पिछाडीवर आहे. अजूनही फॉलोऑन टाळण्यासाठी त्यांना ७२ धावांची गरज आहे. नजमूल हुसेन शंटो खाते न उघडता बाद झाला. यासीर अलीदेखील चार धावा काढून परतला. बांगलादेशने २४.२ षटकांत निम्मा संघ गमावला होता. लिटन दास (२४) आणि झाकिर हुसेनने (२०) धावा केल्या. त्याआधी, रविचंद्रन अश्विन (५८) आणि कुलदीप यादव (४०) यांनी आठव्या गड्यासाठी ८७ धावांची भागीदारी करीत ४०० चा आकडा गाठून दिला.  कुलदीपची ही कसोटीत सर्वोत्कृष्ट खेळी ठरली.  चेतेश्वर पुजाराने सर्वाधिक ९०, श्रेयस अय्यरने  ८६ आणि उमेश यादवने १५ धावांचे योगदान दिले.

शुभमनने घेतला भन्नाट झेलकुलदीप यादवने टाकलेल्या ३२ व्या षटकात पहिलाच चेंडू चांगला टर्न झाला. या फिरकीवर १६ धावांवर खेळणारा नरूल चाचपडला. त्याने चेंडू फ्लिक केला. मात्र शॉर्टलेगला उभ्या असलेल्या शुभमन गिलने आपली एकाग्रता ढळू न देता क्षणार्धात तो झेल टिपला. यावेळी शुभमन गिल कुठेही घाबरल्याचे किंवा अंग चोरत असल्याचे दिसले नाही. 

लिटनवर सिराज भारीबांगलादेशच्या डावात १३ व्या षटकात पहिल्या चेंडूवर वेगवान मोहम्मद सिराज आणि बांगलादेशचा फलंदाज लिटन दास यांच्यात चकमक उडाली. या घटनेनंतर सिराजने लिटनची चक्क दांडी गूल केली.    सहावी कसोटी खेळत असलेल्या श्रेयसने ८६ धावा काढल्या. कसोटीत दहा डावांत त्याने पाचव्यांदा ५० वर धावा काढल्या आहेत. यंदा सर्व प्रकारांत ३८ सामन्यात त्याने १४९८ धावा केल्या.     यष्टिरक्षक ऋषभ पंतने कसोटीत ५० षटकार पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा तो चौथा यष्टिरक्षक बनला.  २५ वर्षांच्या पंतशिवाय ऑस्ट्रेलियाच्या ब्रॅड हॅडिनने ५४,  एमएस धोनीचे ७८ आणि ऑस्ट्रेलियाचा ॲडम गिलख्रिस्टने ७८ षटकार मारले आहेत.  ऋषभने ४६ धावांच्या खेळीत ३२ कसोटीच्या ५४ डावांत चार हजार आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा गाठला.     ९० धावा ठोकणाऱ्या चेतेश्वर पुजाराने ९७ कसोटीत  ६८८२ धावा केल्या. त्याने दिलीप वेंगसरकर यांना मागे टाकले. वेंगसरकरच्या ११६ कसोटीत  ६८६८ धावा आहेत. पुजाराने गेल्या ५१ कसोटी डावांत शतक झळकविलेले नाही. ३ जानेवारी २०१९ ला त्याने सिडनीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचे शतक ठोकले होते. त्यानंतर त्याने १४ अर्धशतके ठोकली, पण शतकापासून वंचित राहिला.

धावफलकभारत पहिला डाव राहुल त्रि. गो. खालिद २२, शुभमन गिल  झे. यासिर गो. तैजुल २०, चेतेश्वर पुजारा त्रि. गो. तैजुल ९०, विराट कोहली पायचित गो. तैजुल १, ऋषभ पंत त्रि. गो. मेहदी ४६, श्रेयस अय्यर त्रि. गो. इबादत ८६,  अक्षर पटेल  पायचित गो. मेहदी १४, रविचंद्रन अश्विन  यष्टिचित नुरुल गो. मेहदी ५८, कुलदीप यादव पायचित गो.  तैजुल  ४०, उमेश यादव नाबाद १५, सिराज झे. मुशफिकूर गो. मेहदी ४ अवांतर: ८, एकूण : १३३.५ षटकात सर्वबाद ४०४. गोलंदाजी: इबादत १/७०, खालिद १/४३,  तैजुल ४/१३३, मेहदी हसन ४/११२.

बांगलादेश पहिला डाव नजमुल शंटो झे. पंत गो. सिराज ००, झाकिर हुसेन झे. पंत गो. सिराज २०, यासिर अली त्रि.गो. उमेश ४,  लिटन दास त्रि. गो. सिराज २४, मुश्तफिकूर पायचित गो. कुलदीप २८, शाकिब अल हसन झे. कोहली गो. कुलदीप ३, नुरुल हसन झे. गिल गो. कुलदीप १६, मेहदी हसन नाबाद १६, तैजुल इस्लाम त्रि. गो. कुलदीप ००, इबादत हुसेन नाबाद १३, अवांतर: ९, एकूण: ४४ षटकात ८ बाद १३३.  गोलंदाजी: सिराज ३/१४, उमेश यादव १/३३, कुलदीप यादव ४/३३.

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेश
Open in App