चितगांव : बांगलादेश आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या पहिल्या कसोटीला आजपासून चितगांव येथे सुरुवात झाली. यजमान बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, परंतु त्यांचे 8 फलंदाज अवघ्या 271 धावांत माघारी परतले होते. मात्र, या सामन्यात मोमिनूल हकची शतकी खेळी महत्त्वाची ठरली. त्याने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या एका विक्रमाशी बरोबरी केली.
2018 मध्ये कोहलीने चार शतकं झळकावली आहेत आणि मोमिनूलनेही तसा पराक्रम केला. त्याने आणि इम्रुल कायेसने दुसऱ्या विकेटसाठी 104 धावा जोडल्या, परंतु बांगलादेशच्या अन्य फलंदाजांनी नांगी टाकल्या. सामन्याच्या 50व्या षटकार मोमिनूलने शतकी आकडा गाठला. त्याने 135 चेंडूंत शतक पूर्ण केले, परंतु चहापानानंतर अवघ्या नऊ चेंडूत त्याला माघारी परतावे लागले. वेस्ट इंडिजच्या शेनॉन गॅब्रिएलने त्याला बाद केले. मोमिनूलने 167 चेंडूंत 10 चौकार व एक षटकार खेचत 120 धावा केल्या. मोमिनूल बाद झाल्यानंतर बांगलादेशचे तळाचे फलंदाज अपयशी ठरले.
2018 हे वर्ष संपण्यापूर्वी मोमिनूलला कसोटी सामन्यांत तीन डाव खेळण्याची संधी मिळणार आहे, तर कोहली सहा डाव खेळणार आहे. कोहली आणि मोमिनूल यांच्यानंतर 2018 मध्ये सर्वाधिक शतकं करणाऱ्या फलंदाजांमध्ये ब्रेंडन टेलर, उस्मान ख्वाजा, क्रेमग ब्रेथवेट, कुसल मेंडिस, एडन मार्कराम आणि जो रूट यांचा क्रमांक येतो. यंदाच्या वर्षात सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये कोहली अव्वल स्थानावर आहे. त्याने 1000 हून अधिक धावा केल्या आहेत आणि एकाही फलंदाजाला 900चा पल्ला पार करता आलेला नाही. मोमिनूलने 13 डावांत 48.61 च्या सरासरीने 632 धावा केल्या आहेत.