पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीत बांगलादेशने नाट्यमयरीत्या १० विकेट्स राखून बाजी मारली आहे. या विजयासह बांगलादेशने कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे कसोटी क्रिकेटच्या इतिहासात बांगलादेशने पाकिस्तानवर पहिल्यांदाच विजय मिळवला आहे. सामन्याच्या शेवटच्या दिवशी विजयासाठी मिळालेल्या ३० धावांच्या आव्हानाचा सहज पाठलाग करत बांगलादेशने या ऐतिहासिक विजयाला गवसणी घातली.
रावळपिंडी येथे झालेल्या पहिल्या कसोटीत पहिल्या डावात ११७ धावांनी पिछाडीवर पडलेल्या पाकिस्तानने आज खेळाच्या शेवटच्या दिवशी १ बाद २३ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. मात्र खेळाच्या सुरुवातीपासूनच पाकिस्तानच्या डावाला गळती लागली. शान मसूद (१४). बाबर आझम (२२), सौद शकील (०), अब्दुल्ला शफिक (३७) हे ठरावीक अंतराने बाद होत गेल्याने पाकिस्तानची अवस्था ५ बाद १०४ अशी बिकट झाली होती. त्यानंतर मोहम्मद रिझवानचा अपवाद वगळता इतर फलंदाजांनी निराशा केल्याने पाकिस्तानचा डाव १४६ धावांवर संपुष्टात आला. बांगलादेशकडून मेहदी हसन मिराज याने ४, शाकिब अल हसनने ३, तर शोरिफूल इस्लाम, हसन महमूद आणि नाहिद राणा यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
पाकिस्तानला केवळ २९ धावांचीच आघाडी घेता आल्याने बांगलादेशला विजयासाठी ३० धावांचे माफक लक्ष्य मिळाले. या लक्ष्याचा झाकिर हसन (नाबाद १५) आणि शादमान इस्लाम (९) या सलामीवीरांनी सहज पाठलाग केला आणि संघाच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले.
तत्पूर्वी पाकिस्तानने आपला पहिला डाव ६ बाद ४४८ धावांवर घोषित केल्यानंतर बांगलादेशने मुशफिकूर रहिमने केलेल्या १९१ धावांच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर ५६५ धावांपर्यंत मजल मारली होती. तसेच पहिल्या डावात ११७ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली होती. ही आघाडी आज बांगलादेशच्या विजयात निर्णायक ठरली. तर १९१ धावांची खेळी करून बांगलादेशच्या विजयाचा पाया रचणारा मुशफिकूर रहीम हा सामनावीर ठरला.