BANW vs INDW 1st T20 Match | सिल्हेट : भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर असून, तिथे पाच सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळवली जात आहे. रविवारी या मालिकेतील पहिला सामना खेळवला गेला. पाहुण्या भारतीय संघाने ४४ धावांनी विजय मिळवून विजयी सलामी दिली. भारताने सांघिक खेळीच्या जोरावर पहिला सामना जिंकला. फलंदाजीत आणि गोलंदाजीत पाहुण्या संघाने चमक दाखवली.
भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने निर्धारित २० षटकांत ७ बाद १४५ धावा केल्या. टीम इंडियाकडून यास्तिका भाटियाने सर्वाधिक ३६ धावा केल्या, तर स्मृती मानधना (९), शेफाली वर्मा (३१), हरमनप्रीत कौर (३०), रिचा घोष (२३), सजीवन सजना (११), पूजा वस्त्राकर (४) आणि श्रेयांका पाटीलने नाबाद एक धाव केली.
१४६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशने २० षटकांत ८ बाद केवळ १०१ धावा केल्या आणि भारताने ४४ धावांनी विजय साकारला. रेणुका सिंगच्या गोलंदाजीचा सामना करताना यजमान संघाला घाम फुटला. रेणुकाने सर्वाधिक (३) बळी घेतले, तर पूजा वस्त्राकर (२) आणि श्रेयांका पाटील, दीप्ती शर्मा आणि राधा यादव यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतले.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ - हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया, दीप्ती शर्मा, एस सजना, रिचा घोष, पूजा वस्त्राकर, श्रेयांका पाटील, रेणुका सिंग, राधा यादव.
ट्वेंटी-२० मालिकेचे वेळापत्रक
३० एप्रिल - दुसरा सामना - सिल्हेट
२ मे - तिसरा सामना - सिल्हेट
६ मे - चौथा सामना - सिल्हेट
९ मे - पाचवा सामना - सिल्हेट