सिल्हेट : भारतीय महिला क्रिकेट संघाने बांगलादेशच्या धरतीवर विजयाची हॅटट्रिक लगावून मालिका आपल्या खिशात घातली. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील टीम इंडिया बांगलादेश दौऱ्यावर असून तिथे पाच सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळवली जात आहे. आज या मालिकेतील चौथा सामना होत आहे. सुरुवातीचे तिन्ही सामने जिंकून पाहुण्या भारताने ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. चौथ्या सामन्यातून ३३ वर्षीय आशा सोभनाने भारतीय संघात पदार्पण केले.
टीम इंडियात पदार्पण करणारी ती सर्वात वयस्कर खेळाडू ठरली आहे. या आधी वयाच्या ३१ व्या वर्षी सीमा पुजारेने २००८ मध्ये श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यातून भारतीय संघाचे तिकीट मिळवले होते. तर, भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर आज तिचा ३०० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळत आहे. भारताने सलग तीन सामने जिंकल्यामुळे यजमान बांगलादेशसाठी उरलेले दोन सामने म्हणजे अस्तित्वाची लढाई आहे.
दरम्यान, भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाने आशा सोभनाला पदार्पणाची कॅप सोपवली. यावेळी भारतीय खेळाडूंनी एकच जल्लोष केला. हरमनप्रीत, स्मृती, रिचा आणि शेफालीसह सर्व संघ व्यवस्थापनाने सोभनाचा उत्साह वाढवला.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, डी हेमलथा, रिचा घोष, दीप्ती शर्मा, एस सजना, पूजा वस्त्राकर, आशा सोभना, तितत साधू, राधा यादव.
बांगलादेशचा संघ -एन सुल्ताना जोटी (कर्णधार), नाहिर अक्तर, दिलारा अक्तर डोला, रूबिया हैदर झेलीक, मुर्शिदा खातून, राबिया, मारूफा अक्तर, एमएसटी शौरीफा खातून, हबिबा इस्लाम पिंकी, एमएसटी रितू मोनी, शोरना अक्तर.