BANW vs INDW T20 Series | सिल्हेट : भारतीय महिला क्रिकेट संघाने इतिहास रचताना बांगलादेशचा त्यांच्याच घरात ५-० असा दारूण पराभव केला. भारत आणि बांगलादेश यांच्यात ट्वेंटी-२० मालिका सुरू होती. गुरूवारी या मालिकेतील अखेरचा सामना खेळवला गेला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील भारताने आपला विजयरथ कायम ठेवत सलग पाचव्या सामन्यात यजमान बांदलादेशला पराभवाची धूळ चारली. या विजयासह पाहुण्या भारताने ५-० असा एकतर्फी विजय नोंदवला.
आगामी काळात होणाऱ्या ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने भारतासाठी ही खुशखबर म्हणावी लागेल. महिला ट्वेंटी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक आयसीसीने जाहीर केले आहे. ३ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर या कालावधीत क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटचा विश्वचषक खेळवला जाईल. बांगलादेशची राजधानी ढाका आणि सिल्हेट येथे हे सामने खेळवले जातील.
अखेरच्या सामन्यात भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्मृती मानधना (३३), दयालन हेमालथा (३७), हरमनप्रीत कौर (३०) आणि रिचा घोष (नाबाद २८ धावा) अशा सांघिक खेळीच्या जोरावर भारताने निर्धारित २० षटकांत ५ बाद १५६ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना यजमान बांगलादेशचा संघ २० षटकांत ६ बाद केवळ १३५ धावा करू शकला आणि सामना २१ धावांनी गमावला. भारताकडून राधा यादवने सर्वाधिक (३) बळी घेतले, तर तितस साधू (१) आणि आशा सोभनाने (२) बळी घेतले.
भारताचा संघ -
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, डी हेमलथा, रिचा घोष, दीप्ती शर्मा, एस सजना, पूजा वस्त्राकर, आशा सोभना, तितत साधू, राधा यादव.
महिलांच्या ट्वेंटी-२० विश्वचषकासाठी दहा संघांचे दोन गटात विभाजन करण्यात आले आहे. अ आणि ब असे दोन गट आहेत. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड हे एकाच गटात आहेत. यजमान बांगलादेश आणि विश्वचषकासाठी पात्र ठरणारा दुसरा संघ ब गटात असेल. प्रत्येक संघ साखळी फेरीतील चार सामने खेळेल. १७ आणि १८ ऑक्टोबरला उपांत्य फेरीचे सामने होतील. तर २० ऑक्टोबर रोजी ढाका येथे अंतिम सामना होईल.
विश्वचषकातील भारताचे सामने -
- ४ ऑक्टोबर - भारत विरूद्ध न्यूझीलंड
- ६ ऑक्टोबर - भारत विरूद्ध पाकिस्तान
- ९ ऑक्टोबर - भारत विरूद्ध क्वालिफायर १
- १३ ऑक्टोबर - भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया