Caribbean Premier League 2022 : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत वेस्ट इंडिजकडून ६ फूट व १४० किलो वजनाच्या खेळाडूने पदार्पण केले, तेव्हा त्याचीच चर्चा रंगली. पहिल्या आंतरराष्ट्रीय कसोटीत चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजा यासारखे स्टार फलंदाज बाद करून त्याने करिष्मा केला होता. अशा या रहकिम कोर्नवॉलने ( Rahkeem Cornwall) बुधवारी कॅरेबियन प्रीमिअर लीगच्या ( CPL 2022) क्वालिफायर १ सामन्यात तुफान फटकेबाजी केली. त्याने केवळ १३ चेंडूंत ७४ धावांचा पाऊस पाडताना बार्बाडोस रॉयल्स ( Barbados Royals) दणदणीत विजय मिळवून दिला. गयाना अॅमेझॉन वॉरियर्सविरुद्धची ही लढत रॉयल्सने ८७ धावांनी विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला.
प्रथम फलंदाजी करताना रॉयल्सने २० षटकांत ५ बाद १९५ धावांचा डोंगर उभा केला. सलामीवीर रहकिमने ५४ चेंडूंत ९१ धावांची वादळी खेळी केली. त्याने ११ षटकार व २ चौकारांची आतषबाजी करून अवघ्या १३ चेंडूंत ७४ धावा कुटल्या. कर्णधार कायले मेयर्सने २६ धावांचे योगदान दिले. आझम खानने ३५ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ५२ धावा करताना संघाच्या धावसंख्येत महत्त्वाचा वाटा उचलला. स्टार गोलंदाज किमो पॉल, ओडिन स्मिथ आणि इम्रान ताहिर यांची रहकिमने निर्दयीपणे धुलाई केली. प्रत्युत्तरात वॉरियर्सचा संपूर्ण संघ १७.४ षटकांत १०८ धावांत तंबूत परतला. कर्णधार शिमरोन हेटमायर ( ३७) हा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. रहकिमने गोलंदाजीतही कमाल दाखवताना १० धावांत २ विकेट्स घेतल्या.