कोरोना संकटात ब्रेक लागलेल्या स्थानिक क्रिकेट स्पर्धांना आजपासून सुरूवात होत आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ट्वेंटी-20 स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी नवा वाद समोर येत आहे. ३८ संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत बडोदा संघाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. एलिट गट क मध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आहे आणि उत्तराखंडविरुद्ध त्यांचा पहिला सामना होणार आहे. पण, पहिल्या सामन्याला २४ तासांहून कमी कालावधी शिल्लक असताना बडोदा संघ वादामुळे चर्चेत आला आहे. संघातील टॉप खेळाडू दीपक हुडानं या स्पर्धेतून माघार घेतली आहे. कर्णधार कृणाल पांड्या ( Krunal Pandya) यानं सहकाऱ्यांसमोर शिवीगाळ केल्याचा आरोपावरून हा वाद सुरू झाला आहे. उप कर्णधार दीपक हुडानं बडोदा क्रिकेट असोसिएशनकडे लेखी तक्रार केली आहे.
वडोदरा येथील रिलायन्स स्टेडियमवर सराव करताना दीपक आणि कृणाल यांच्यात वाद झाला. त्यानंतर दीपकनं बडोदा क्रिकेट असोसिएशनला मेल करून कृणालनं शिवीगाळ केल्याचा आरोप केला. शिवाय त्यानं या स्पर्धेतून माघार घेत असल्याचेही सांगितले. TV9 Gujarati या स्थानिक चॅनेलनही ही बातमी दाखवली. कृणालसोबत हा वाद इतका ताणला की दीपक मानसिक तणावाखाली गेला. बडोदा संघासाठी हा मोठा धक्का आहे. दीपकनं ४६ प्रथम श्रेणी, ६८ लिस्ट ए आणि १२३ ट्वेंटी-20 सामने खेळले आहेत. दीपक हा इंडियन प्रीमिअर लीगमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबचा सदस्य आहे. .
मुंबई इंडियन्सचा सदस्य कृणाल पांड्या यापूर्वीही वादात अडकला आहे. आयपीएलच्या १३व्या पर्वानंतर यूएईहून मायदेशात परतताना अतिरिक्त सोनं आणि मौल्यवान वस्तू आणल्यामुळे त्याला मुंबई विमानतळावर अडवण्यात आले होते. काही वृत्तानुसार या वस्तूंची किंमत ही एक कोटीच्या वर होती आणि त्याला त्यासाठी दंड भरावा लागला.
Web Title: Baroda cricketer Deepak Hooda accuses Krunal Pandya of abusing him; withdraws his name from Syed Mushtaq Ali Trophy
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.