नवी दिल्ली : इस्रोचा विक्रम लँडरशी असलेला संपर्क तुटल्यानं चांद्रयान-2 मोहिमेला धक्का बसला. भारतीय चांद्रयान-२ चे विक्रम हे लँडर शनिवारी पहाटे १ वाजून ५५ मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करण्याच्या बेतात असतानाच ऑर्बिटरचा आणि लँडरचा संपर्क तुटला. इस्त्रोच्या या कामगिरीचे कौतुक साऱ्यांनीच केले आहे आणि त्यांच्या पाठिशी ठामपणे उभेही राहिले आहेत. भारताचा माजी सलामीवीर आणि खासदार गौतम गंभीरने तर एक धक्कादायक विधान केले आहे. भारताचा एक फलंदाज चंद्रावरही फलंदाजी करू शकतो, असे वक्तव्य करत गंभीरने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. आता हा चंद्रावरही बॅटींग करू शकणारा फलंदाज कोण, याची उत्सुकता तुम्हाला लागलेली असेल.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ट्वेन्टी-20 मालिकेला 15 सप्टेंबरला सुरुवात होणार आहे. पण सध्याच्या घडीला भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 'अ' संघांमध्ये सामने सुरु आहेत. शुक्रवारी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 'अ' संघांमध्ये ट्वेन्टी-20 सामना खेळवण्यात आला. या सामन्यामध्ये भारताच्या एका फलंदाजाने धडाकेबाज खेळी साकारली. आतापर्यंत या फलंदाजाने चांगली कामगिरी केली आहे, पण तरीही त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आलेले नाही.
या खेळाडूची दमदार खेळी पाहून भाराताचा फिरकीपटू हरभजन सिंग भारावला आणि त्याने एक ट्विट केले. या ट्विटमध्ये हरभजन म्हणाला की, " भारतीय संघ सध्या चौथ्या क्रमांकाच्या फलंजाजीच्या शोधात आहे. या फलंदाजाकडे चांगले तंत्र आहे, त्याचबरोबर चांगल्या फॉर्मात आहे. दक्षिण आफ्रिकेच्या 'अ' संघाविरोधात त्याने दमदार खेळी साकारली आहे."
हरभजनच्या ट्विटवर गंभीरने आपली प्रतिक्रीया दिली आहे. गंभार म्हणाला की, " हो. हरभजन, तुझे बरोबरी आहे. हा स्टार फलंदाज सध्या चांगल्या फॉर्मात आहे. त्यामुळे तो सध्याच्या घडीला चंद्रावरही फलंदाजी करू शकतो. नवनियुक्त फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड या फलंदाजाला संधी देतील, अशी आशा आहे. कारण दक्षिण आफ्रिकेच्या 'अ' संघाविरुद्ध त्याने 48 चेंडूंत 91 धावांची खेळी साकारली होती."
गंभीरने ज्याचे कौतुक केले, तो फलंदाज आहे संजू सॅमसन. दक्षिण आफ्रिकेच्या 'अ' संघाविरुद्ध त्याने 48 चेंडूंत 91 धावा साकारल्या होत्या. त्यामुळे आता त्याला भारतीय संघातही स्थान मिळायला हवे, अशी भूमिका हरभजन आणि गंभीर यांनी घेतली आहे.