Join us  

रैना बरसला! 49 चेंडूत शतक, खेळली मुश्ताक अली टी-20 मधील सर्वात मोठी खेळी 

सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 स्पर्धेमध्ये बंगालविरुद्धच्या लढतीत सध्या भारतीय संघातून बाहेर असलेला डावखुरा धडाकेबाज फलंदाज...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2018 6:33 PM

Open in App

कोलकाता - सध्या भारतीय संघातून बाहेर असलेला डावखुरा धडाकेबाज फलंदाज सुरेश रैनाची बॅट सोमवारी बऱ्याच दिवसांनंतर तळपली. सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 स्पर्धेमध्ये बंगालविरुद्ध घणाघाती शतक ठोकत रैनाने फॉर्ममध्ये परतण्याचे संकेत दिले आहेत. इडन गार्डनवर झालेल्या या लढतीत सुरेश रैनाने 59 चेंडूत नाबाद 126 धावांची खेळी केली. ही खेळी या स्पर्धेच्या इतिहासामधील सर्वात मोठी वैयक्तिक खेळी, तसेच टी-20 क्रिकेटमध्ये कुठल्याही भारतीय क्रिकेटपटूने केलेली दुसरी सर्वात मोठी खेळी ठरली आहे. या खेळीदरम्यान 7 षटकार आणि 13 चौकारांची आतषबाजी करणाऱ्या रैनाने 49 चेंडूतच शतक पूर्ण केले होते.कोलकाता येथील इडन गार्डनवर सुरू असलेल्या सुपर लीगमधील ब गटातील लढताती रैनाच्या शतकी खेळीच्या जोरावर उत्तर प्रदेशने 20 षटकांत 3 बाद 235 धावा कुटल्या. त्यानंतर या आव्हानाचा पाठलाग करताना बंगालचा संघ अवघ्या 160 धावांत गारद झाला. रैनाचे आयपीएलपूर्वी फॉर्ममध्ये परतणे हे स्पर्धेत पुनरागमन करत असलेल्या चेन्नई सुपरकिंग्जसाठी शुभसंकेत आहेत. चेन्नईच्या संघाने सुरेश रैनाला 11 कोटी रुपयांमध्ये रिटेन केले आहे. 

रैनाने केलेली 126 धावांची खेळी सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेमधील सर्वात मोठी वैयक्तिक खेळी ठरली आहे. हा विक्रम करताना त्याने दिल्लीच्या उन्मुक्त चंद याने 2013 साली केलेला 125 धावांच्या खेळीचा विक्रम मोडीत काढला. आहे. तसेच टी-20 क्रिकेटमध्ये भारताकडून खेळण्यात आलेली ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी खेळी ठरली आहे. टी-20 मध्ये सर्वात मोठ्या वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम मुरली विजयच्या नावावर आहे. त्याने 2010 साली आयपीएलमध्ये 127 धावांची खेळी केली होती. तसेच टी-20 क्रिकेटमध्ये चार शतके फटकावणारा सुरेश रैना हा विराट कोहली आणि रोहित शर्मानंतरचा तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.  

टॅग्स :क्रिकेटसुरेश रैनाभारतीय क्रिकेट संघ