सौरभ गांगुली लिहितात...
मालिकेचा निकाल पूर्वीच निश्चित झाल्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बुधवारपासून खेळल्या जाणा-या तिस-या व अखेरच्या कसोटीपूर्वी सर्वसाधारण भावना आहेत, पण अद्याप बराच खेळ शिल्लक असल्याचे मला वाटते. खेळपट्टीबाबत फार चर्वितचर्वण सुरू आहे. भारताला कशा प्रकारची खेळपट्टी मिळणार, याची चर्चा आहे. मैदानावरील कर्मचारी हिरवळ असलेल्या खेळपट्टीबाबत बोलत आहेत, पण पहिला चेंडू पडल्याशिवाय खेळपट्टीबाबत काहीच सांगता येत नाही. भारतीय संघ पाच वेगवान गोलंदाजांसह खेळणार असल्याची चर्चा आहे, पण कसोटी क्रिकेटमध्ये फिरकीपटूची भूमिका महत्त्वाची ठरते. पाच दिवसांच्या क्रिकेटमध्ये गोलंदाजीमध्ये विविधता असणे गरजेचे असते.
रविचंद्रन आश्विनचे फलंदाजीतील योगदान बघितल्यानंतर त्याच्याकडे डोळेझाक करता येणार नाही. या मालिकेत भारतीय गोलंदाज शानदार फॉर्मात आहेत. त्यांनी दोन्ही कसोटी सामन्यांत चारही वेळा प्रतिस्पर्धी संघाचा डाव गुंडाळला आहे. त्यामुळे आता धावा फटकावण्याची जबाबदारी सर्वस्वी फलंदाजांवर आहे. फलंदाजांमध्येही गुणवत्ता आहे. त्यांनी यापूर्वीही चांगली कामगिरी केलली आहे. त्यामुळे पुन्हा त्यांना त्याची पुनरावृत्ती करता येणार नाही, यासाठी कुठले कारण नाही. त्यांनी स्वत:च्या क्षमतेवर विश्वास ठेवायला हवा. प्रत्येक धाव घेण्यासाठी संघर्ष करायला हवा.
भारतीय संघ पाच गोलंदाजांना खेळविणार की चार गोलंदाजांना हा प्रश्न उपस्थित होतो. सामना सुरू होण्यापूर्वी खेळपट्टीवरील हिरवळ कायम राहिली तर भारतीय संघाने चार गोलंदाजांना खेळवित अतिरिक्त फलंदाजाला संधी द्यायला हवी. तसे जर नसेल तर पाच गोलंदाजांना संधी देण्याची रणनीती कायम ठेवायला हवी.
कोहलीच्या नेतृत्वगुणांबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे. विदेशातील त्याच्या नेतृत्वाखालील ही पहिलीच मालिका आहे. त्यामुळे संयम बाळगणे आवश्यक आहे. कुणीच कर्णधार म्हणून जन्माला येत नाही. नेतृत्वकौशल्य विकसित करावे लागते. कोहली कर्णधार म्हणून विकसित होत असल्याचा मला विश्वास आहे. कर्णधारापुढे वैयक्तिक कामगिरीत सातत्य राखण्याचे मोठे आव्हान असते आणि त्यात कोहली कमालीचा यशस्वी ठरला आहे. कर्णधार म्हणून त्याची कामगिरी उल्लेखनीय ठरेल, यात मला कुठलीच शंका नाही. आगामी कालावधीत भारताला देशाबाहेर बरेच क्रिकेट खेळायचे आहे. त्यामुळे कोहलीला प्रत्येकाचा सपोर्ट मिळणे आवश्यक आहे. दरम्यान, आयसीसी क्रिकेटर आॅफ द इयर पुरस्काराचा मानकरी ठरल्याबाबत मी विराटचे अभिनंदन करतो. (गेमप्लान)
Web Title: The batsmen expected to perform well
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.