Join us  

फलंदाजांना खेळपट्टीवर टिकून राहावे लागेल

पहिल्या कसोटीमध्ये भारताला दक्षिण आफ्रिकेकडून ७२ धावांनी पराभव पत्करावा लागला. यजमानांनी आणि विशेषकरून वर्नोन फिलँडरने दुसºया डावात ६ बळी घेत जबरदस्त कामगिरी केली. भारताला २०८ धावांचे लक्ष्य मिळाले होते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 3:07 AM

Open in App

- अयाझ मेमन(संपादकीय सल्लागार)पहिल्या कसोटीमध्ये भारताला दक्षिण आफ्रिकेकडून ७२ धावांनी पराभव पत्करावा लागला. यजमानांनी आणि विशेषकरून वर्नोन फिलँडरने दुसºया डावात ६ बळी घेत जबरदस्त कामगिरी केली. भारताला २०८ धावांचे लक्ष्य मिळाले होते. अनेकांना हे लक्ष्य खूप सोपे वाटेल, पण तसे नव्हते. कारण त्या खेळपट्टीवर आणि त्या परिस्थितीमध्ये हे खूप कठीण आव्हान होते. खेळपट्टी गोलंदाजांसाठी पोषक होती आणि चेंडू चांगले स्विंग होत होते, शिवाय अनपेक्षित उसळतही होते. त्यामुळे येथे फलंदाजी सोपी नव्हती. पण तरीही भारतीय संघ आपल्या फलंदाजीवर अत्यंत निराश असेल. आघाडीच्या कोणत्याही फलंदाजाने आपल्या लौकिकानुसार कामगिरी केली नाही. पहिल्या डावात हार्दिक पंड्याने जर ९३ धावा केल्या नसत्या, तर या सामन्यात भारताचा खूप लवकर पराभव झाला असता. भारतीय संघामध्ये क्षमता आणि जोश नक्कीच आहे, पण तांत्रिकदृष्ट्या खेळाडू सक्षम नसतील तर संघ अडचणीत येईल. फलंदाजांना सर्वप्रथम खेळपट्टीवर टिकून राहावे लागेल. सर्वच गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. रविचंद्रन आश्विननेही २ बळी घेत चांगला मारा केला आणि विशेषकरून वेगवान गोलंदाजांनी सिद्ध केले, की भारताकडे प्रतिस्पर्धी संघाला बाद करण्यासारखे गोलंदाज आहेत. पण आघाडीची फळी तुम्हाला साथ देत नसेल, तर परदेशात विजय मिळवणे खूप अडचणीचे ठरेल.मालिकेत पहिल्या पराभवाने भारताला झटका बसलाच आहे. आता पुनरागमन करण्यासाठी संघ व्यवस्थापनाला खूप विचार करावा लागेल. ज्या प्रकारे शिखर धवन आखूड टप्प्याच्या चेंडूंना अडखळला, ते पाहता लोकेश राहुलला संधी मिळण्याची शक्यता वाटत आहे. कारण राहुल वेगवान गोलंदाजांना खूप चांगल्या प्रकारे खेळतो. त्याचबरोबर रोहित शर्मावरही प्रश्न निर्माण होत आहेत. श्रीलंकेविरुद्ध केलेल्या शानदार कामगिरीच्या जोरावर त्याला संघात स्थान देताना अजिंक्य रहाणेला बाहेर बसवले होते. पाच विशेष तज्ज्ञ फलंदाज खेळविण्याचा विचार चुकीचा नव्हता. कारण, संघाकडे आश्विन, पंड्या, साहा यांच्या रुपाने अष्टपैलू खेळाडू होते. सामना जिंकायचा असेल, तर ५ गोलंदाजांची आवश्यकता असते. पण, जर आघाडीच्या ५ फलंदाजांमध्येच कमजोर निघत असतील, तर सामना जिंकण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. त्यामुळे मला वाटते, की कदाचित रोहितच्या जागेवर पुन्हा एकदा रहाणेला स्थान मिळू शकेल. कारण रहाणेची परदेशातील कामगिरी खूप चांगली आहे आणि रोहितने मिळालेली संधी गमावली आहे. गोलंदाजांविषयी सांगायचे झाल्यास, ५ गोलंदाज खेळविण्याचा विचार योग्य असला, तरी ५ फलंदाज खेळपट्टीवर टिकून राहणेही तेवढेच महत्त्वाचे होते. हे खरं आहे, की पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनाही अपेक्षित कामगिरी करता आली नाही. पण, ज्या प्रकारे एबी डिव्हिलियर्स आणि फाफ डू प्लेसिस खेळले ते महत्त्वाचे होते. कर्णधार विराट कोहलीनेही म्हटले, ‘कमीत कमी दोन फलंदाजांनी ७०-८० धावा काढल्या पाहिजेत, नाहीतर अशा खेळपट्टीवर संघाला विजय मिळवणे खूप कठीण होईल.’

टॅग्स :क्रिकेट