नवी दिल्ली : राजस्थान रॉयल्सने चेन्नईवर १६ धावांनी मात करीत पहिला विजय नोंदवला. २१७ धावांचे आव्हान असताना धोनीने सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येणे पसंत केले. यामुळे सोशल मीडियावर चाहते नाराज झाले. ‘संघाला गरज असताना धोनी उशिरा फलंदाजीला येऊन काय साध्य करतोय,’ असा सवाल उपस्थित करण्यात आला. माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनेही धोनीच्या या निर्णयावर टीका केली.
‘खरे सांगायचे तर थोडे आश्चर्य वाटले. धोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येतो? ऋतुराज गायकवाड, सॅम कुरेन यांना आधी संधी देऊन काय साध्य करायचे होते. तू कर्णधार आहेस. पुढे येऊन नेतृत्व करणे अपेक्षित आहे. राजस्थानविरुद्ध जे केले त्याला नेतृत्व करणे म्हणत नाही. सामना तर केव्हाच संपला होता. डुप्लेसिसने एकाकी झुंज दिली,’ असे परखड मत गंभीरने व्यक्त केले.
अखेरच्या षटकात धोनीने तीन षटकार खेचले. पण त्याला काहीच अर्थ नव्हता. या केवळ वैयक्तिक धावा होत्या. धोनी सातव्या स्थानी आला, याची फारशी चर्चा होत नसली तरी नेतृत्वावर प्रश्न उपस्थित होतात, त्याचे काय, असा सवाल गंभीरने उपस्थित केला.
‘फिनिशर’च्या भूमिकेसाठी थोडा वेळ : फ्लेमिंगमहेंद्रसिंग धोनीला ‘फिनिशर’च्या भूमिकेत येण्यासाठी थोडा वेळ लागेल. त्याच्याकडून मोठ्या कामगिरीची प्रत्येकाला प्रतीक्षा आहे, असे चेन्नई सुपर किंग्सचे प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांनी म्हटले आहे. चेन्नई संघ मंगळवारी लक्ष्याचा पाठलाग करताना अपयशी ठरला. त्यावेळी भारताचा माजी कर्णधार धोनी खेळपट्टीवर होता. धोनीने मंगळवारी सातव्या क्रमांकावर फलंदाजी केली. त्याने मोठे फटके खेळण्यापूर्वी खेळपट्टीवर स्थिरावण्यास वेळ घेतला.तो निर्णय योग्य, धोनीने दिले उत्तरमुंबईविरुद्ध धोनीने स्वत:ला मागे ठेवून रवींद्र जडेजा आणि सॅम कुरेन यांना संधी दिली. त्याचा लाभही झाला. मात्र राजस्थानविरुद्ध मात्र धोनीने स्वत:ला मागे ठेवून चूक केल्याचे सर्वांचे म्हणणे आहे. धोनीने यावर उत्तर दिले. तो म्हणाला, ‘काही प्रयोग केले जात आहेत. कुरेनला आधी पाठवणे हा त्याचाच भाग होता. आमच्याकडे पर्याय आहेत, त्यामुळे जुन्या धोरणाचा वापर पुन्हा करू शकतो. स्पर्धेच्या सुरुवातीला असे प्रयोग करण्याची संधी असते.’