- अयाज मेमन
भारताने इंग्लंडला ४-१ ने धूळ चारली. इंग्लंडने मालिकेत पहिली कसोटी जिंकली, त्यावेळी ओली पोप ज्या अंदाजात खेळला ते पाहून भारतीय फिरकीपटूंचा पाहुण्यांपुढे निभाव लागणार नाही, असे वाटले होते. पण, त्यानंतर बाजी पलटली. यशस्वी जैस्वाल (७१२ धावा), शुभमन गिल (४५२), रोहित शर्मा (४००), रविचंद्रन अश्विन (२६ बळी), जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव (१९-१९ बळी), सरफराज खान (२०० धावा), ध्रुव जुरेल (१९०) या कामगिरीवर नजर टाकल्यास हा सामूहिक प्रयत्नांचा विजय ठरतो.
हा विजय विशेष...
हा विजय विशेष यासाठी की, मालिकेत विराट आणि शमीसारखे अनुभवी खेळाडू नव्हते. एका सामन्यात जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली होती. रवींद्र जडेजादेखील एका सामन्यास मुकला होता. अशावेळी पहिला विजय नोंदविणारा इंग्लंड आपल्या नवोदित फिरकी गोलंदाजांच्या बळावर भारताला जाळ्यात अडकवेल, असे चित्र निर्माण झाले होते. टॉम हार्टले याने हैदराबाद कसोटीच्या दोन्ही डावांत ९ गडी बाद केले होते. पण, पहिल्या विजयानंतरही इंग्लंड संघ मालिकेत मोठ्या फरकाने पराभूत झाला.
भारताची रणनीती इंग्लंडवर भारी
भारताने इंग्लंडला मैदानावरच हरविले नाही, तर रणनीतीतही धूळ चारली. हा संघ भारतात दाखल होताच त्यांनी बॅझबॉलचा धाक दाखविला. भारतीय खेळाडूंनी त्यांचे काहीही ऐकले नसावे. रोहितने स्मार्ट नेतृत्व केले. अश्विन, कुलदीप, जडेजा यांनी पराभवातून धडा घेत अचूक टप्पा राखून चेंडूचा वेग आणि फ्लाइटची उंची यात बदल केला. त्यामुळे इंग्लिश फलंदाजांच्या स्वीप, रिव्हर्स स्वीप, स्कूपला आळा घालता आला. मुख्य कोच राहुल द्रविड यांनी प्रत्येक इंग्लिश फलंदाजाच्या खेळाचा अभ्यास केला. त्यातून त्यांनी डावपेच आखले. या बळावर इंग्लंडच्या प्रत्येक डावाला खिंडार पाडणे सोपे झाले. ४०-५० धावांत प्रतिस्पर्धी संघाचे ७-८ बळी घेणे सोपे होत गेले.
इंग्लंडवर मानसिक दडपण
कर्णधार रोहितने गोलंदाजीत बदल केले, क्षेत्ररक्षणात व्यूहरचना केली आणि वेगवान तसेच फिरकी गोलंदाजीत संयोजन साधले. यामुळे इंग्लंडच्या फलंदाजांवर मानसिक दडपण आणणे शक्य झाले होते. सर्वांत ‘फ्लॉप’ ठरला तो कर्णधार बेन स्टोक्स. दहा डावांत त्याला २०० धावादेखील करता आल्या नाहीत. फलंदाजी खराब होत असताना तो सहकाऱ्यांचा क्रम बदलू शकला असता. हे करण्यापेक्षा तो स्वत:ची नैसर्गिक फलंदाजीही विसरला होता. इंग्लंडकडे प्लान ‘अ’ (बॅझबॉल) होता; पण हा संघ त्यात अपयशी ठरला तेव्हा त्यांच्याकडे प्लान ‘ब’ तयारच नव्हता. हेच त्यांच्या पराभवाचे मोठे कारण ठरले.