मेलबर्न - क्रिकेटला महान अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखले जाते. याचाच प्रत्यय आज बिग बॅश लीगमध्ये आला. सिडनी सिक्सर्सने अटीतटीच्या झालेल्या लढतीमध्ये अॅडिलेड स्ट्रायकर्सला चार विकेट्सनी पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला. आता अंतिम फेरीत सिडनी सिक्सर्सचा सामना पर्थ स्कॉचर्सशी होणार आहे.
या लढतीत सिडनी सिक्सर्स संघाला विजयासाठी ६ चेंडूत १२ धावांची गरज होती. मात्र सुरुवातीच्या दोन चेंडूत दोन विकेट्स पडल्या. अशा परिस्थितीत सिडनीसमोरील अडचणी वाढत होत्या. मात्र हेडन केरने अखेरच्या मोक्याच्या क्षणी जिगरबाज खेळ करत संघाला सामन्यात विजय मिळवून दिला.
१६८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सिडनी सिक्सर्सने १९ षटकांमध्ये ४ विकेट्स गमावून १५६ धावा जमवल्या होत्या. शेवटच्या ६ चेंडूत विजयासाठी १२ धावांची गरज होती. सीन अॅबॉट आणि हेडन केर खेळपट्टीवर होते. त्याचवेळी अखेरचं षटक टाकणाऱ्या हॅरी कॉनवेने पहिल्याच चेंडूवर अॅबॉटला बाद केले. तर पुढच्याच चेंडूवर बेन ड्वारशुइस धावबाद झाला. मात्र तत्पूर्वी एक धाव काढल्याने आता ४ चेंडूत ११ धावांची गरज होती. तिसऱ्या चेंडूवर जॉर्डनने एक धाव घेत हेडनला स्ट्राईक दिली. चौथ्या चेंडूवर हेडन केरने षटकार मारला. मग पाचव्या चेंडूवर दोन धावा घेतल्या. त्याचवेळी सिल्क रिटायर्ड हर्ट झाला. शेवटच्या दोन चेंडूंत दोन धावांची गरज असताना हेडन केरने चौकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला.
हेडन केर १६ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर झेलबाद होताना बचावला होता. त्यानंतर त्याने ५८ चेंडून नाबाद ९८ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. त्याने आपल्या डावात १० चौकार आणि २ षटकार ठोकले. आता स्पर्धेचा अंतिम सामना मेलबर्नमध्ये पर्थ स्कॉचर्स आणि सिडनी सिक्सर्स मध्ये खेळवला जाईल.