इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठीचे मेगा ऑक्शन १२ व १३ फेब्रुवारीला बंगळुरू येथे पार पडणार आहे. त्याआधी काही प्रमुख खेळाडूंकडे साऱ्यांच्या नजरा खिळल्या आहेत आणि त्यापैकी एक नाव म्हणजे राशीद खान( Rashid Khan)... अफगाणिस्तानच्या या युवा फिरकीपटूनं ट्वेंटी-२० फॉरमॅटमध्ये एक दबदबा निर्माण केला आहे आणि त्यामुळे त्याला जगभरातील फ्रँचायझी लीगमध्ये मागणी आहे. पैशांच्या बोलीवरून फिसकटल्यामुळे त्यानं IPL 2022मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे आणि नव्यानं दाखल झालेली अहमदाबाद फ्रँचायझी त्याला आपल्या ताफ्यात घेण्यास उत्सुक असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राशीदसाठी तगडी रक्कम मोजण्यासाठी कुणीही तयार असेल.
आयपीएल २०२२च्या लिलावापूर्वी राशीद खाननं बिग बॅश लीगमध्ये ( BBL ) धुरळा केला आहे. एडलेड स्ट्रायकर्स संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राशीदनं ब्रिस्बन हिट्स संघाविरुद्ध पराक्रमी कामगिरी केली. पहिल्या षटकात ११ धावा देणाऱ्या राशीदनं पुढील तीन षटकांत ६ धावा देत ६ विकेट्स घेत इतिहास रचला. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर स्ट्रायकर्सनं ७१ धावांनी मोठा विजय मिळवला. स्ट्रायकर्सच्या ४ बाद १६१ धावांच्या प्रत्युत्तरात ब्रिस्बन हिट्सचा संपूर्ण संघ १५ षटकांत ९० धावांत माघारी परतला.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या स्ट्रायकर्सकडून मॅथ्यू शॉर्ट ( २७) , हेन्री हंट ( २५) , जॅक वेदराल्ड (३५), थॉमस केली ( २४*) आणि जॉनथन वेल्स ( २३*) यांनी चांगला खेळ केला. प्रत्युत्तरात हिट्सकडून लॅचलन प्फेफर ( २३) व बेन डकेट ( २४) यांनाच संघर्ष करता आला. राशीदनं टाकलेल्या पहिल्या षटकात ११ धावा आल्या. पण त्यानंतर त्यानं हिट्सच्या फलंदाजांची दाणादाण उडवली. त्यानं चार षटकांत १७ धावा देताना ६ विकेट्स घेतल्या. बिग बॅश लीगमधील ही तिसरी सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. २०१२मध्ये लसिथ मलिंगां ७ धावांत ६ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर २०१७मध्ये इश सोढीनं ११ धावांत ६ विकेट्स घेतल्या. BBLमध्ये डावात सहा विकेट्स घेणारा तो तिसरा गोलंदाज आहे.