Join us  

Kane Richardson BBL 2023 Video: 'सुपर-भन्नाट' कॅच! चेंडू हवेत जाताच रिचर्डसन वाऱ्याच्या वेगाने धावला अन् झेपावला...

स्वत:च्याच गोलंदाजीवर असा झेल घेणं खूप कठीण असतं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2023 4:54 PM

Open in App

Kane Richardson BBL 2023 Video: बिग बॅश लीगमध्ये (BBL) खेळत असलेला ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज केन रिचर्डसन याने आपल्या उत्कृष्ट गोलंदाजी सोबतच धडाकेबाज क्षेत्ररक्षणाच्या जोरावर साऱ्यांचीच वाहवा मिळवली. स्वत:च्या गोलंदाजीवर त्याने असा झेल टिपला की संघातील खेळाडूंसोबतच फलंदाजही हैराण झाला. रिचर्डसन BBL लीगमध्ये मेलबर्न रेनेगेड्सकडून खेळत आहे. या सामन्यात मेलबर्न संघाने होबार्ट हरिकेन्स संघाचा पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना होबार्ट हरिकेन्स संघाने आठ गडी गमावून १६२ धावा केल्या. मेलबर्न संघाने १९ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर चार विकेट्स गमावून हे लक्ष्य गाठले आणि सामना सहा गडी राखून जिंकला. या सामन्यात चर्चा रंगली ती रिचर्डसनने टिपलेल्या कॅचची. १७व्या षटकात रिचर्डसनने केली किमया

होबार्ट हरिकेनचा संघ प्रथम फलंदाजी करत होता. शेवटच्या टप्प्यात त्यांना झटपट धावा काढायच्या होत्या. रिचर्डसनने १७वे षटक टाकले आणि विल पार्कर त्याच्यासमोर फलंदाजी करत होता. विलने वेगवान धावा करण्याचा प्रयत्न केला. रिचर्डसनला हे माहित होते आणि म्हणूनच त्याने पहिला चेंडू बाउन्सर टाकला. विलने त्यावर एक पुल शॉट खेळला आणि चेंडू त्याच्या बॅटच्या वरच्या कडेवर लागून हवेत गेला. रिचर्डसनने नॉन-स्ट्रायकरच्या टोकापासून धाव घेतली आणि वेगाने धावत जाऊन अप्रतिम झेल टिपला. पाहा हा भन्नाट झेल-

हा झेल घेतल्यानंतर रिचर्डसन काही वेळ जमिनीवर पडून राहिला आणि हसत राहिला. कारण त्याने हा झेल घेतल्याचे त्याला स्वत:लाही आश्चर्य वाटत होते. या दरम्यान त्याच्या संघातील खेळाडूंनी त्याचे अभिनंदन केले. यावेळी होबार्टची धावसंख्या १२९ धावांवर होती आणि विलच्या रूपाने संघाला सातवा धक्का बसला. होबार्टकडून एकाही फलंदाजाला अर्धशतक झळकावता आले नाही. कॅलेब ज्युवेल आणि बेन मॅकडरमॉट यांनी प्रत्येकी २८ धावा केल्या. कर्णधार मॅथ्यू वेडने २० धावा केल्या. फहीम अश्रफने १७ चेंडूत २६ धावा केल्या. जोएल पॅरिस १६ धावा करून नाबाद राहिला. मेलबर्नसाठी रिचर्डसनने चार षटकांत २० धावा देत दोन बळी घेतले. टॉम रॉजर्सने चार षटकांत ४० धावा देत दोन बळी घेतले.

टॅग्स :बिग बॅश लीगआॅस्ट्रेलियासोशल व्हायरल
Open in App