BBL 2023: मेलबर्न रेनेगेड्स आणि पर्थ स्कॉचर्स यांच्यातील बिग बॅश लीग 2023-24 सामना एका विचित्र कारणामुळे अनिर्णित राहिला. अशा प्रकारच्या विचित्र कारणामुळे सामना थांबवावा लागण्याची लीगच्या इतिहासात ही पहिलीच वेळ ठरली. जिलॉन्गच्या सायमंड्स स्टेडियमवर स्कॉर्चर्सच्या डावात रेनेगेड्स विल सदरलँडने एकाच ठिकाणी तीन चेंडू टाकले. फलंदाज जोश इंग्लिसला तिन्ही वेळा ते चेंडू खेळता आले नाहीत. त्यानंतर अखेर सात षटकांचा खेळ झाल्यावर एका वेगळ्याच कारणामुळे सामना बंद करावा लागला.
पर्थ स्कॉचर्स संघाने 6.5 षटकात 2 गडी बाद 30 धावा केल्या. स्टीफन एस्किनाझी शून्यावर खाते न उघडता आणि कूपर कॉनोली 6 धावा करून बाद झाला. अॅरॉन हार्डी 20 धावांवर तर जोश इंग्लिस 3 धावा करून क्रीजवर खेळत होता. टॉम रॉजर्सने 1 आणि विल सदरलँडने 1 विकेट घेतली. त्यावेळी एक किस्सा घडला. गोलंदाजाने एकाच टप्प्यावर तीन चेंडू टाकले पण तीनही चेंडू फार विचित्र इकडे-तिकडे फिरले. त्यानंतर अखेर खराब खेळपट्टीच्या कारणास्तव लीगमध्ये पहिल्यांदा सामना या कारणामुळे रद्द झाला.
फॉक्स क्रिकेटच्या मते, फलंदाज खेळपट्टीवर नाराज होते. अशी खेळपट्टी म्हणजे एकप्रकारचा 'विनोद' आहे असे म्हणताना त्यांनी ऐकले. यानंतर पंचांनी खेळ थांबवला आणि २० मिनिटांच्या विलंबानंतर या खेळपट्टीवर खेळणे धोकादायक असल्याचे घोषित करण्यात आले. आदल्या दिवशी पडलेल्या पावसाच्या वेळी कव्हरमधून पावसाचे पाणी झिरपून खेळपट्टीवर पोहोचले आणि त्यामुळे खेळपट्टीवर असमान बाऊन्स दिसला असे सांगितले जात आहे.
रेनेगेड्सचा कर्णधार एरॉन फिंच म्हणाला, “मी पंच काय म्हणत आहेत ते ऐकले नाही, परंतु साहजिकच येथे ओल्या पॅचमधून चेंडू कसे उसळत होते याची त्यांना चिंता होती. पंच खेळपट्टीवर होते त्यामुळे त्यांना त्याची जास्त चांगल्या प्रकारे कल्पना होती." दरम्यान, खेळाडूंच्या सुरक्षेसाठी सामना थांबवला असला तरी सामना लवकर संपल्याने प्रेक्षक संतापले. दोन्ही संघांना १-१ गुण मिळाल्याचे जाहीर केल्यानंतर, संपूर्ण मैदानात गोंगाट झाला आणि काही प्रेक्षकांनी मैदानावर काही वस्तू फेकून आपली नाराजी व्यक्त केली.