आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा तोंडावर आली असताना ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये ( BBL) नव्या नियम आणण्याची तयारी सुरू झाली आहे. आतापर्यंत गोलंदाजांकडून चूक झाली तर प्रतिस्पर्धी फलंदाजांना फ्री हिट मिळायचे. पण, आता प्रस्तावित नियमानुसार गोलंदाजांनाही फ्री हिट मिळणार. सामन्यात फलंदाज विनाकारण वेळ वाया घालवतात आणि त्यामुळेच हा नवा नियम आणण्याची शिफारस केली गेली आहे. ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये वेळ वाया घालवणारे अनेक फलंदाज आहेत आणि त्यांच्यावर जरब बसण्यासाठी हा नियम आणला जात आहे.
BBL प्रमुख या नियमाबद्दल विचार करत आहेत. फलंदाज स्टम्पला कव्हर न करता बाजूला उभा राहील आणि गोलंदाज स्टम्पला हिट करण्याचा प्रयत्न करेल. जर चेंडू स्टम्पला लागला तर फलंदाजाला बाद दिले जाईल आणि जर तसं न झाल्यास, फलंदाज डाव पुढे सुरू ठेवेल.
बिग बॅश लीगच्या मागील पर्वातील सामने प्रदीर्घ काळ चालले आणि त्यामुळे फॅन्सच्या नाराजीचा व्यवस्थापकांना सामना करावा लागला. आता फुटकचा वेळ वाया घालवणाऱ्या फलंदाजांना शिस्त लावण्यासाठी हा नियम आणला जात आहे. BBLच्या सुरुवातीच्या काही वर्षांत तीन तासांत सामने संपायचे, परंतु आता ३ तास ४० मिनिटे लागतात. त्यामुळे आता फलंदाजाला क्रीजवर पोहोचण्यासाठी ७५ सेकंदाचा वेळ ठेवला जाईल. हा नियम पुरुष व महिला BBLमध्ये लागू केला जाऊ शकतो. फलंदाज ७५ सेकंदात क्रीजवर न आल्यास, गोलंदाजाला फ्री हिट बॉल टाकायला मिळेल.