BBL 2022, Superb catch video: ऑस्ट्रेलियाची बिग बॅश लीग (BBL) खूप प्रसिद्ध आहे. या टी२० लीगमध्ये कायमच थरारक किस्से घडत असतात. या लीगमध्ये शनिवारी सिडनी थंडर्स आणि होबार्ट हरिकेन्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. हा सामना सिडनी संघाने जिंकला. त्यांचा एक गोलंदाज गंभीर जखमी होण्यापासून थोडक्यात बचावला. त्याने स्वतःला वाचवलेच, पण त्याच्या प्रयत्नामुळे त्याने एक भन्नाट झेलही घेतला. बेन डॉगेट असे या खेळाडूचे नाव आहे. या गोलंदाजाने सिडनीला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
बेनने आपल्या चार षटकांत ३५ धावा देत चार बळी घेतले. त्याच्याशिवाय बेन कटिंगने दोन बळी मिळवले. ख्रिस ग्रीन, नॅथन मॅकअँड्र्यू, उस्मान कादिर यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. डॅनियल सॅम्सला मात्र विकेट घेता आली नाही. हरिकेन्स संघाने २२९ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. बेन डावातील सोळावे षटक टाकत होता. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर बेनने सर्वोत्तम झेल टिपला. बेनने चेंडू टाकताच नॅथन एलिसने जोरदार फटका मारला. हा फटका थेट बेनच्या दिशेने वेगाने आला. बुलेटच्या वेगाने आलेला चेंडू बेनने पकडला. हा चेंडू बेनच्या पायावर आदळला असता तर त्याला नक्कीच गंभीर दुखापत होऊ शकली असती, पण बेनने अप्रतिम झेल टिपला.
फलंदाजाने मारलेला शॉट खूप वेगवान होता आणि चेंडू पकडत असताना बेनच्या हातात लागला. कॅच घेतल्यावर बेन पुन्हा पुन्हा हाताकडे बघत होता. या सामन्यात दोन्ही संघांकडून धावांचा पाऊस पाडला गेला. प्रथम फलंदाजी करताना सिडनीने सहा गडी गमावून २२८ धावा केल्या. त्याच्याकडून अलेक्स हेल्सने ४५ चेंडूत ७७ धावा केल्या. आपल्या खेळीत या फलंदाजाने पाच चौकार आणि चार षटकार मारले. ऑलिव्हर डेव्हिसने ३२ चेंडूत पाच चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने ६५ धावा केल्या. मॅथ्यू वेडने देखील ३० चेंडूत ६७ धावा केल्या. या फलंदाजाने आपल्या डावात सहा षटकार ठोकले. त्याच्याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाने त्याला साथ दिली नाही. वेडचा संघ १७ षटकांत १६६ धावा करू शकला त्यामुळे सिडनी संघाने हा सामना ६२ धावांनी जिंकला.