ऑस्ट्रेलियात सध्या बिग बॅश लीगचा थरार सुरु आहे. या स्पर्धेतील २९ व्या सामन्यात स्टार बॅटर डेविड वॉर्नरसोबत अजब गजब दुर्घटना घडली. सुदैवानं तो हेल्मेट घालून बॅटिंग करत असल्यामुळे मोठा अनर्थ टळला. सिडनी थंडर आणि होबार्ट हरिकेन्स यांच्यातील सामन्यात डेविड वॉर्नरसंदर्भात जो प्रकार घडला त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जे घडलं ते सर्वांनाच थक्क करून सोडणारे
सिडनी थंडरच्या डावात डेविड वॉर्नर फलंदाजी करत होता. गोलंदाजाने टाकलेल्या चेंडूवर त्याने जोरदार फटका मारला. बॅट अन् बॉलचा संपर्क झाला. पण त्यानंतर जे घडलं ते सर्वांनाच थक्क करून सोडणारे होते. डेविड वॉर्नरच्या बॅटचा दांडाच निखळला. एवढेच नाही तर बॅट त्याच्या मानेच्या भागावर आपटली. हेल्मेट असल्यामुळे त्याच्यावर ओढावलेले मोठं संकट टळलं. त्यानंतर वॉर्नरनं या मॅचमध्ये नाबाद ८८ धावांची खेळी केली.
वॉर्नर मोठा फटका मारायला गेला अन् हातातील बॅटनं दिला दगा
होबार्ट हरिकेन्सच्या ताफ्यातील जलदगती गोलंदाज रायली मेरेडिथ याच्या गोलंदाजीवर हा सर्व प्रकार घडला. डावाच्या पहिल्याच षटकात डेविड वॉर्नर त्याला जोरदार फटका मारायला गेला अन् हातातील बॅटनं त्याला दगा दिला. बॅट दांड्यातून निखळून हाती आल्यामुळे बॅटचा फटका डेविड वॉर्नरच्या पाठीच्या वर मानेच्या भागा जवळ बसला. तुटलेली बॅटचा पहिला आघात हा हेल्मेटवर झाल्यामुळे मोठी हानी टळली. बिग बॅश लीगच्या अधिकृत एक्स अकाउंटवरुनही हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
वॉर्नरची दमदार खेळी ठरली व्यर्थ
पहिल्या ओव्हरमध्ये जे घडलं ते विसरुन वॉर्नरनं स्फोटक अंदाजात बॅटिंग केल्याचे पाहायला मिळाले. त्याने ६६ चेंडूत ८८ धावांची नाबाद खेळी साकारली. त्याच्या या खेळीच्या जोरावर सिडनीच्या संघानं निर्धारित २० षटकात ६ विकेट्सच्या मोबदल्यात १६४ धावा केल्या. वॉर्नरनं आपल्या दमदार खेळीत ७ चौकार मारले. हा सामना मात्र होबार्ट संघानं जिंकला.