सिडनी : काळानुसार क्रिकेटमध्ये अनेक तांत्रिक बदल झाले. त्यामुळे पंचांना निर्णय देण्यास बरेच सहकार्य मिळत आहे. आता आणखी एक बदल पाहायला मिळणार आहे. क्रिकेटच्या चेंडूत आता मायक्रोचीप बसवण्यात येणार आहे आणि त्याची चाचणी ही बिग बॅश लीगमध्ये घेण्यात येणार आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यात हा चेंडू कसोटी क्रिकेटमध्येही वापरला जाऊ शकतो.
ऑस्ट्रेलियातील क्रिकेटचे चेंडू बनवणाऱ्या प्रसिद्ध कंपनीनं असा चेंडू तयार केला असून त्याची अंतिम चाचपणी सुरू आहे. या चेंडूला 'दी स्मार्टबॉल' असे नाव देण्यात आले आहे. या मायक्रोचीपमुळे चेंडूची गती, उसळी घेण्यापूर्वीची दिशा आणि उसळी घेतल्यानंतरची दिशा याची त्वरीत माहिती मिळणार आहे. त्याशिवाय फिरकीपटूंच्या फिरकीचे मोजमापही करता येणार आहे. शिवाय पंचांना DRS प्रक्रियेसाठीही याची मदत होणार आहे.