ढाका : बांगलादेश क्रिकेटमधील स्टार खेळाडू शाकिब अल हसन पुन्हा एकदा वादात अडकला. सट्टेबाजीशी संबंधित कंपनीच्या समर्थनार्थ त्याने केलेल्या पोस्टचा तपास करण्याचे बांगलादेश क्रिकेट बोर्डाने ठरविले आहे. आयसीसीने २०१९ला भारतीय सट्टेबाजाने दिलेल्या प्रलोभनाची माहिती दडविल्याप्रकरणी शाकिबवर वर्षभराची बंदी घातली होती.
बांगलादेश क्रिकेटच्या नियमानुसार सट्टेबाजीचे समर्थन करणे आणि प्रोत्साहन करण्यावर बंदी आहे. क्रिकबजच्या वृत्तानुसार अष्टपैलू शाकिबने अलीकडे सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये ‘बेटविनर न्यूृज’ या कंपनीत आपली भागीदारी असल्याची घोषणा केली होती. याप्रकरणी शाकिबला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल, अशी माहिती बीसीबी प्रमुख नजमुल हसन यांनी दिली.
शाकिबने ४०० आंतरराष्ट्रीय सामन्यात १२ हजारांहून अधिक धावा केल्या असून, ६५० बळी घेतले. नजमुल म्हणाले, ‘शाकिबने आमच्याकडून अशी परवानगी घेतलेली नाही आणि आम्ही परवानगी देत नाही. शिवाय त्याने बीसीबीच्या करारावर स्वाक्षरी केली का हे तपासावे लागेल. बोर्ड त्याला विचारणा करणार असून, नंतर आवश्यक ती कारवाई केली जाईल.’