मुंबई : भारतीय संघाचा यष्टिरक्षक दिनेश कार्तिकने भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाच्या ( बीसीसीआय) नियमांचे उल्लंघन केले. बीसीसीआयकडून कारणे दाखवा नोटीस गेल्यानंतर कार्तिकनं सोमवारी बिनशर्त माफी मागितली. त्याच्या या लेखी माफिनंतर या प्रकरणावर पडदा पडला.
नेमकं काय घडलं होतं?कार्तिक हा इंडियन प्रीमिअर लीगमध्ये कोलकाता नाइट रायडर्सचा सदस्य आहे. कोलकाता संघाचे मालकी हक्क बॉलिवूड स्टार शाहरुख खान याच्याकडे आहे. याच शाहरुखचा कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्येही त्रिंबागो नाइट रायडर्स हा संघ आहे. या संघाच्या सामन्याच्यावेळी कार्तिक हा खेळाडूंच्या ड्रेसिंग रुममध्ये दिसला होता. त्यामुळे बीसीसीआयच्या नियमांचे उल्लंघन झाले होते.
''बीसीसीआयनं कार्तिकची माफी स्वीकारली आहे आणि आता हे प्रकरण संपले आहे,''असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं सांगितले. नियानुसार या सामन्याला उपस्थिती लावण्यापूर्वी कार्तिकला बीसीसीआयची परवानगी घेणे भाग होते, परंतु त्यानं तसं केलं नाही.
कोणत्याही खाजगी लीगशी संलग्न होण्याची परवानगीही बीसीसीआयचा करार देत नाही. पण, तरीही कार्तिक कॅरेबियन लीगमध्ये दिसला. त्यानं त्रिंबागो संघाची जर्सीही परिधान केली होती. त्यावरून बीसीसीआयनं त्याला करार का रद्द करू नये, याबाबत विचारणा केली होती.
त्यावर उत्तर देताना कार्तिकनं आपण कोलकाता नाइट रायडर्सचे प्रशिक्षक ब्रेंडन मॅकलम यांच्या विनंतीचा मान राखण्यासाठी तेथे गेलो आणि त्यांनीच आग्रह केला म्हणून संघाची जर्सी घातली, असे स्पष्टीकरण दिले.