नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियात यंदा होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या भविष्याचा फैसला लांबणीवर टाकल्यावरून बीसीसीआय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर नाराज आहे. आयसीसी चेअरमन शशांक मनोहर हे हेतुपुरस्सर हा मुद्दा लांबणीवर टाकत असून आयपीएलचे आयोजन होऊ नये, असा यामागील हेतू असल्याचा आरोप बीसीसीआयने केला आहे.
क्रिकेट आॅस्ट्रेलियाचे चेअरमन अर्ल एडिंग्ज यांनी १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत होणाºया विश्वचषकाच्या यजमानपदाबाबत कालच असमर्थता जाहीर केली. तरीही आयसीसीने जुलैअखेर निर्णय घेण्याचे धोरण अवलंबल्यामुळे आयपीएल आयोजनास फटका बसू शकतो, असे बीसीसीआयला वाटते.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ पदाधिकाºयाने स्वत:चे नाव उघड न करण्याच्या अटीवर महिती दिली. हा अधिकारी म्हणाला, ‘सध्या आयसीसी चेअरमन असलेले मनोहर संभ्रम का निर्माण करीत आहेत? यजमान बोर्ड विश्वचषकाचे आयोजन करणार नसेल तर घोषणा करण्यासाठी एक महिना कशाला हवा?’
या महिन्याच्या सुरुवातीला आयसीसीने आयोजनासाठी एक महिना प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला होता. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आयोजनाचा निर्णय घेण्याआधी आकस्मिक योजनांचाही विचार केला जाईल, असे म्हटले होते. या अधिकाºयाच्या मते, ‘स्पर्धा स्थगितीचा निर्णय लवकर झाल्यास सदस्य देश आपापल्या द्विपक्षीय मालिकेच्या योजना आखू शकतील. हा केवळ आयपीएल आयोजनाचा प्रश्न नाही. जे खेळाडू आयपीएलमध्ये नाहीत ते आपापल्या देशांकडून मालिका खेळू शकतील. निर्णय घेण्यास उशीर होत असल्याने सर्वांचेच नुकसान होत आहे.’
बीसीसीआयशी संबंधित लोकांनी पुढील आयसीसी चेअरमन पदाची नामांकन प्रक्रिया सुरू करण्याची औपचारिक घोषणा का करण्यात आलेली नाही, असा सवाल उपस्थित केला. याविषयी बीसीसीआयचा एक अनुभवी अधिकारी म्हणाला, ‘आयसीसी बोर्डाची अलीकडे जी बैठक झाली त्यात अन्य मुद्दे चर्चेला आले, मात्र हा मुद्दा नव्हताच. मला विचाराल तर मनोहर चेअरमनपद सोडतील यावर माझा विश्वास नाही. ते तिसºया ‘टर्म’साठीही प्रयत्न करू शकतात. ‘नामांकन प्रक्रिया लांबल्यास सर्व संमतीचा उमेदवार निवडण्यास अडचण होईल,’ अशी भीती आयसीसी बोर्डाच्या सदस्यांना वाटू लागली आहे.
बोर्डाचा एक सदस्य म्हणाला, ‘कोलिन ग्रेव्ह हे चेअमन पदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. सौरभ गांगुली या पदासाठी इच्छुक नसते तर तर ग्रेव्ह यांना बीसीसीआयचादेखील पाठिंबा असता. गांगुलींनी उमेदवारी जाहीर केल्यास निवडणूक उत्कंठापूर्ण होईल. एहसान मनी हेदेखील दावेदारांमध्ये आहेत. त्यांना मात्र बीसीसीआयचा पाठिंबा मिळणार नाही. न्यूझीलंड क्रिकेटच्या प्रमुख डेबी हॉकले यांचे नावदेखील या पदासाठी पुढे येत आहे. (वृत्तसंस्था)
आयसीसीने लवकर निर्णय घेतल्यास बीसीसीआय आयपीएलसाठी संभाव्य यजमान शोधू शकेल. यात श्रीलंका प्रमुख आहे. त्यांच्याकडे प्रेमदासा, पाल्लेकल, आणि हंबनटोटा अशी मैदाने आहेत. यूएईच्या तुलनेत श्रीलंका हा बीसीसीआयसाठी कमी खर्च होणारा यजमान देश आहे. सप्टेंबरमध्ये आयपीएल आयोजनास श्रीलंका आदर्श स्थळ असेल, अशी पावती सुनील गावसकर यांनीदेखील दिली.
बीसीसीआय आणि मनोहर यांच्यातील मतभेद नवीन नाहीत. नागपुरात वास्तव्य करणारे ख्यातनाम विधिज्ञ मनोहर हे कुणाच्याही दडपणास बळी पडत नाहीत. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्यासोबतचे त्यांचे संबंध मधुर नव्हतेच. नेमक्या याच मुद्यावरून तणावाची स्थिती कायम आहे. अधिकाºयाच्या मते, मनोहर स्वत: बीसीसीआयचे माजी अध्यक्ष असले तरी आमच्या हिताविरुद्ध काम करीत आहेत. आयसीसीच्या नफ्यात बीसीसीआयचा मोठा वाटा असला तरी त्यांनी बीसीसीआयच्या अनुदानात कपात केली.
Web Title: BCCI Accuses ICC President Shashank Manohar of Deliberately Causing Confusion over T20 World Cup
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.