मुंबई, आयसीसी वर्ल्ड कप २०१९ : गतवर्षी इंग्लंड दौऱ्यावर भारतीय खेळाडूंना फार काही चांगली कामगिरी करता आली नव्हती. कसोटीत झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर दौऱ्यावर आलेल्या खेळाडूंच्या कुटुंबीयांचा मुद्दा चर्चेत आला होता. आता आगामी वर्ल्ड कप स्पर्धेच्या निमित्ताने हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. पण यावेळी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) भारतीय खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या पत्नी किंवा कुटुंबीयांना किंवा लग्न व्हायचं असल्यास गर्लफ्रेंडला इंग्लंड दौऱ्यावर येण्याची परवानगी दिली आहे. पण त्यात त्यांनी अट ठेवली आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेत खेळाडू व सपोर्ट स्टाफ यांना त्यांच्या कुटुंबीयांना इंग्लंडमध्ये सोबत घेऊन जाता येणार आहे. पण फक्त १५ दिवसांसाठी... स्पर्धेचे सुरुवातीचे २१ दिवस कुटुंबीयांना इंग्लंडमध्ये खेळाडूंसोबत राहता येणार नाही. त्यांना तीन आठवड्यानंतर खेळाडूंसोबत राहण्याची परवानगी बीसीसीआयने दिली आहे. ३० मे पासून ही स्पर्धा सुरू होत आहे आणि भारत पहिला सामना ५ जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे.
बीसीसीआयच्या या निर्णयामुळे कुटुंबीयांना भारत- पाकिस्तान सामन्याला मुकावे लागणार आहे. याआधी कुटुंबीयांना १०-१२ दिवसच खेळाडूंसोबत राहता येईल असे बोलले जात होते,परंतु आता १५ दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे बीसीसीआयने यासाठी कर्णधार विराट कोहलीचे मत घेतलेले नाही. कोहलीने संपूर्ण स्पर्धेत कुटुंबीयांसोबत राहण्याची मागणी केली होती.