मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची ( बीसीसीआय) संघ निवड प्रक्रिया नेहमी वादात अडकली आहे. अनकेदा निवड समितीच्या अनेक निर्णयांवर माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेटतज्ज्ञ यांनी नाराजी प्रकट केली आहे. भारताचे महान फलंदाज सुनील गावसकर यांनी बीसीसीआयच्या संघ निवड प्रक्रियेवर टीकेची तोफ डागली आहे. बीसीसीआय मुंबईच्या खेळाडूंना सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप गावसकर यांनी केला. मुंबईच्या सिद्धेश लाडची बाजू मांडताना गावसकर यांनी आणखी अमोल मुजुमदारवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली.
स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करूनही सिद्धेश लाडला भारत 'A' संघात स्थान देण्यात आले नाही. यावर विचारले असता गावसकर यांनी नाराजी प्रकट केली. अमोल मुझुमदार सारखी सिद्धेश कारकीर्द संपू नये अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले," संघ जेव्हा जेव्हा अडचणीत सापडला तेव्हा सिद्धेशने डाव सावरला आहे. सातत्यपूर्ण कामगिरी करूनही त्याला भारत 'A' संघात स्थान मिळू नये हे दुर्दैवी आहे."
अन्य राज्यातील खेळाडूकडे एकदोन सामन्याचा अनुभव असूनही त्याला भारत A संघात स्थान मिळते. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये धावांचा शिखर उभारणाऱ्या मुझुमदारवर अन्याय झाला. आशा करतो सिद्धेशच्या बाबतीत तसे घडू नये," असेही गावसकर यांनी नमूद केले. सिद्धेशने 43.39 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर सहा शतक आणि 21 अर्धशतक आहेत. मुझुमदारने 171 प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 30 शतक आणि 50 अर्धशतकांसह 11,167 धावा केल्या आहेत.