Join us  

विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात प्रेक्षकांचा 'दुष्काळ', स्टँड रिकामे पाहून नेटकऱ्यांनी BCCIची घेतली शाळा

ICC odi world cup 2023 : आजपासून वन डे विश्वचषकाला सुरूवात झाली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2023 4:02 PM

Open in App

ENG vs NZ | अहमदाबाद : आयसीसी वन डे विश्वचषकाला आजपासून सुरूवात झाली आहे. सलामीचा सामना गतविजेत्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवला जात आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरू असलेल्या उद्घाटनाच्या सामन्यातील रिकाम्या स्टँडचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मेगा क्रिकेट इव्हेंटमध्ये प्रेक्षकांच्या कमतरतेमुळे नेटकरी बीसीसीआयला लक्ष्य करत आहेत.

दरम्यान, प्रेक्षकांच्या अनुपस्थितीमुळे देशातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम पूर्णपणे रिकामे दिसत आहे. उद्घाटनाच्या सामन्याची ही अवस्था आयसीसी आणि बीसीसीआयसाठी निराशाजनक तर आहेच, पण चिंतेचा विषयही आहे. सामन्याच्या तिकिटांची विक्री न झाल्याने ही परिस्थिती उद्भवली. खरं तर अहमदाबादमधील या स्टेडियमची एकूण १.३ लाख प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे.

आजच्या सामन्यासाठी किवी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सलामीच्या सामन्यातच गतविजेत्या इंग्लिश संघाला झटका बसल्याचे दिसते. कारण अष्टपैलू बेन स्टोक्स आजच्या सामन्याला मुकणार आहे. दरम्यान, विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा कार्यवाहक कर्णधार टॉम लॅथमने इंग्लंडविरुद्ध नाणेफेक जिंकली आहे. त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडचा नियमित कर्णधार केन विल्यमसन या सामन्यात खेळत नाही. लॉकी फर्ग्युसनही दुखापतीमुळे बाहेर आहे.

आजच्या सामन्यासाठी न्यूझीलंडचा संघ -टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मॅट हेन्री, मिचेल सँटनर, जिमी नीशम, ट्रेन्ट बोल्ट.

आजच्या सामन्यासाठी इंग्लंडचा संघ -जोस बटलर (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, हॅरी ब्रूक,  लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम करन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड.

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपबीसीसीआयइंग्लंडनरेंद्र मोदी स्टेडियमन्यूझीलंड