IPL 2021 Phase 2 : भारतीय क्रिकेटविश्वात सध्या गोंधळ सुरू असल्याचे दिसत आहे. चौथ्या कसोटीत मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह तिघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला अन् त्यांना विलगीकरणात जावे लागले. त्यात पाचव्या कसोटीपूर्वी टीम इंडियाचे फिजिओ योगेश परमार यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि मँचेस्टर येथे होणारी पाचवी कसोटीच रद्द करावी लागली. त्यामुळे आता इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL 2021) सहभागी होणारे खेळाडू यूएईच्या दिशेन प्रवास करू लागले आहेत. रॉयल चँलेजर्स बंगळुरूनं ( RCB) कर्णधार विराट कोहलीसाठी स्पेशन चार्टर्ड फ्लाईट पाठवलं आहे. पण, दुसरीकडे रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, इशान शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज व चेतेश्वर पुजारा यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवण्याची वेळ बीसीसीआय व आयपीएल फ्रँचायझींवर आली आहे.
T20 World Cup : पाकिस्तानला हलक्यात घेऊ नका, ते खूप धोकादायक आहेत; गौतम गंभीरचा अन्य संघांना सल्ला
आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा १९ सप्टेंबरपासून यूएईत खेळवण्यात येणार आहे. पाचव्या कसोटीपूर्वी टीम इंडियाचे फिजिओ योगेर परमार यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि मँचेस्टर कसोटीच रद्द करावी लागली. या वृत्तानंतर बीसीसीआय आणि आयपीएल फ्रँचायझी हे रोहित, शमी, सिराज, इशांत, पुजारा आणि जडेजा यांच्यावर लक्ष ठेऊन आहेत. हे सर्व खेळाडू फिजिओ योगेश परमार यांच्या संपर्कात आले होते, असे वृत्त InsideSportनं दिले आहे. त्यामुळे हे खेळाडू आयपीएलच्या काही सामन्यांना मुकणार की काय, अशी भीती व्यक्त होत आहे.
पाचव्या कसोटीच्या आदल्या दिवशी टीम इंडियाच्या खेळाडूंची भ्रमंती, स्टोअरमध्ये शॉपिंग अन् फोटोशूट?
रवी शास्त्री आणि विराट कोहली यांच्यासोबत पुस्तक अनावरण सोहळ्यात मोहम्मद सिराज यानंही हजेरी लावली होती. याच पुस्तक अनावरण सोहळयातून टीम इंडियाच्या ताफ्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याचा दावा इंग्लिश मीडियानं केला आहे. पाचवा कसोटी सामना रद्द करावा अशी मागणी करणाऱ्या खेळाडूंमध्ये रोहित शर्मा हे आघाडीचे नाव होते आणि त्याच्या दुखापतीवर परमार यांनी उपचार केले होते. बीसीसीआयनं या खेळाडूंना काळजी घेण्यास सांगितले आहे आणि त्यांना हॉटेल रुम्समध्येच राहण्याचा सल्ला दिला गेल आहे. त्यामुळे या खेळाडूंच्या फ्रँचायझी फिंगर क्रॉस करून आहेत.
''बीसीसीआय याबाबत काय नियमावली बनवते, याची प्रतीक्षा आम्ही करत आहोत. आम्ही आशा करतो की सर्व खेळाडू सुरक्षित असतील आणि ते यूएईतही सुरक्षित दाखल होतील. एक जरी पॉझिटिव्ह रिपोर्ट आला तर त्याचा परिणाम संपूर्ण स्पर्धेवर होईल. सर्व खेळाडूंनी दोन्ही डोस घेतले आहेत आणि त्यामुळे चिंता करण्याचे कारण नसावे,''असे एका फ्रँचायझीच्या अधिकाऱ्यानं सांगितले.
''परिस्थिती धोक्याचा इशारा देत आहे. एक जरी पॉझिटिव्ह रिपोर्ट आला तर संपूर्ण आयपीएल अडचणीत येईल. सर्व खेळाडू एकत्र होते आणि एकाच चार्टर्ड फ्लाईटनं यूएईत दाखल होणं अपेक्षित होते,''असेही एका फ्रँचायझीनं सांगितले.