भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( BCCI) बुधवारी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या वार्षिक कराराची घोषणा केली. बीसीसीआयनं एकूण १९ खेळाडूंना सेंट्रल करार दिले असून मागील वर्षाच्या तुलनेत ही संख्या ३ ने कमी आहे. बीसीसीआयनं जाहीर केलेल्या करारानुसार ट्वेंटी-२० क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर, उप कर्णधार स्मृती मानधना आणि फिरकीपटू पूनम यादव यांना A श्रेणीत कायम ठेवले आहे. वन डे संघाची कर्णधार मिताली राज, सीनियर गोलंदाज झुलन गोस्वामी, दीप्ती शर्मा, पुनम राऊत, राजेश्वरी गायकवाड, शेफाली वर्मा, राधा यादव, शिखा पांडे, तानिया भाटीया व जेमिमा रॉड्रीग्ज यांना B श्रेणीत स्थान दिले गेले आहे. ( India Women’s Annual Contracts 2020-21)
शेफाली वर्मानं मागच्या वर्षी प्रथमच वार्षिक करारात स्थान पटकावले होते आणि यंदा तिचं C श्रेणीतून B श्रेणीत प्रमोशन झाले आहे. वेदा कृष्णमुर्ती, एकता बिस्त, अनुज पाटील आणी डी हेमलथा यांना 2020-21च्या करारातून वगळण्यात आले आहे. वेदानं नुकतंच कोरोनामुळे तिच्या आई व बहिणीला गमावले. C श्रेणीत मानसी जोशी. अरुंधती रॉय, पूजा वस्त्रकर, हर्लीन देओल, प्रिया पुनिया व रिचा घोष यांचा समावेश आहे.
बीसीसीआयच्या करारानुसार A श्रेणीतील खेळाडूला वर्षाला ५० लाख, B श्रेणीसाठी ३० लाख आणि C श्रेणीसाठी १० लाख मिळणार आहेत. दरम्यान, भारतीय महिला संघ दोन आठवड्यांच्या क्वारंटाईन कालावधीसाठी मुंबईत आहेत. तेथून ते लंडन दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. १६ जूनपासून एकमेव कसोटी सामन्यानं या दौऱ्याला सुरुवात होईल, त्यानंतर तीन वन डे व तीन ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका होईल. या दौऱ्यासाठी शेफालीला कसोटी व वन डे संघात पदार्पणाची संधी आहे, तर तानिया व शिखा यांचे पुनरागमन झाले आहे. अनकॅप यष्टिरक्षक इंद्रायणी रॉय हिलाची पदार्पणाची संधी आहे.