वन डे वर्ल्ड कप २०२३ नंतर टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक कोण असेल, याची चिंता भारतीय चाहत्यांना लागली होती. राहुल द्रविड आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा कार्यकाळ वन डे वर्ल्ड कपनंतर संपला. राहुल द्रविड करार वाढवण्यात इच्छुक नसल्याच्या बातम्याही समोर आल्या, त्यामुळे BCCI ने नव्या प्रशिक्षकासाठी शोधाशोध सुरू केली होती. पण, अखेर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid) आणि सपोर्ट स्टाफ यांच्या करारात वाढ केल्याची घोषणा केली. बीसीसीआयने द्रविडशी चर्चा केली आणि एकमताने कार्यकाळ पुढे नेण्यास सहमती दर्शविली. या कराराचा नेमका कालावधी किती हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही, पंरतु सूत्रांच्या माहितीनुसार ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ पर्यंत द्रविड व सपोर्ट स्टाफ कायम राहणार हे निश्चित.
भारतीय संघाच्या यशस्वी वाटचातील द्रविड याच्या महत्त्वपूर्ण भूमिकेची बोर्डाने कबुली दिली आणि त्याच्या व्यावसायिकतेची प्रशंसा केली. व्हीव्हीएस लक्ष्मण यांचे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख आणि प्रभारी मुख्य प्रशिक्षक म्हणून त्याने केलेल्या अनुकरणीय कामगिरीचेही बीसीसीआयने कौतुक केले.
बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी म्हणाले की, " राहुल द्रविडची दूरदृष्टी, व्यावसायिकता आणि अथक प्रयत्न हे टीम इंडियाच्या यशाचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. केवळ आव्हाने स्वीकारल्याबद्दलच नव्हे तर त्यांचा समर्थपणे सामना केल्याबद्दल द्रविड यांचे मी कौतुक करतो. भारतीय संघाची कामगिरी त्यांच्या धोरणात्मक मार्गदर्शनाचा पुरावा आहे. त्यांनी मुख्य प्रशिक्षकपदाची ऑफर स्वीकारल्याचा मला आनंद झाला आहे."
“मी राहुल द्रविड यांच्या नियुक्तीच्या वेळीच मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी त्यांच्यापेक्षा चांगला कोणी नसल्याचा उल्लेख केला होता आणि द्रविडने स्वतःला पुन्हा सिद्ध केले आहे,'' असे बीसीसीआयचे मानद सचिव जय शाह म्हणाले.