Join us  

५ कसोटी, ८ ट्वेंटी-२० अन् ३ वन डे! BCCI ने जाहीर केलं टीम इंडियाचं वर्ल्ड कपनंतरचे वेळापत्रक 

गुरुवारी २०२४-२५ वर्षातील भारताच्या पुरुष क्रिकेट संघाच्या घरच्या मैदानावर होणाऱ्या वेळापत्रकाची घोषणा केली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 4:40 PM

Open in App

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI ) गुरुवारी २०२४-२५ वर्षातील भारताच्या पुरुष क्रिकेट संघाच्या घरच्या मैदानावर होणाऱ्या वेळापत्रकाची घोषणा केली. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघ झिम्बाब्वे व श्रीलंकेचा दौरा करणार आहे. त्यानंतर घरच्या मैदानावर बांगलादेश, न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्याविरुद्ध एकूण ५ कसोटी, ८ ट्वेंटी-२० व ३ वन डे सामने खेळणार आहे. 

वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघ पाच ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेत टीम इंडियाची दुसरी फळी पाठवणार असल्याची माहिती समोर येत आहे. ६ ते १४ जुलै या कालावधीत ही मालिका पार पडेल. त्यानंतर २६ जुलैपासून ३ वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाईल.

दरम्यान, भारतीय चाहत्यांना घरच्या मैदानावर क्रिकेटचा आनंद लुटता येणार आहे. भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी व ३ ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. १९ सप्टेंबर व २७ सप्टेंबर अशा दोन कसोटी अनुक्रमे चेन्नई व कानपूर येथे खेळवल्या जाणार आहेत. त्यानंतर ६, ९ व १२ ऑक्टोबरला धर्मशाला, दिल्ली व हैदराबाद येथे ट्वेंटी-२० सामने होतील. 

ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंड भारत दौऱ्यावर ३ कसोटी सामने खेळण्यासाठी येणार आहे. १६ ऑक्टोबरला पहिली कसोटी बंगळुरू येथे खेळवली जाईल, त्यानंतर २४ ऑक्टोबर व १ नोव्हेंबरला पुणे व मुंबई येथे दुसरी व तिसरी कसोटी होईल. जानेवारी २०२५ मध्ये इंग्लंडचा संघ पाच ट्वेंटी-२० व ३ वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात येईल.  

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघबीसीसीआयभारत विरुद्ध बांगलादेशन्यूझीलंडइंग्लंड