भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या मानधनात वाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सोमवारी एक ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. जय शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार देशांतर्गत क्रिकेटमध्ये ४० हून अधिक सामन्यांमध्ये प्रतिनिधीत्व केल्लाय सिनिअर खेळाडूंचं मानधन आता ६० हजार रुपये इतकं असणार आहे. तर २३ वर्षांखालील खेळाडूंचं मानधन २५ हजार आणि १९ वर्षाखालील क्रिकेटपटूंचं मानधन २० हजार रुपये इतकं असणार आहे.
इतकंच नव्हे, तर २०१९-२० या काळात कोरोना महामारीमुळे देशातील अनेक स्थानिक क्रिकेट स्पर्धा रद्द कराव्या लागल्या होत्या. याचंही ५० टक्के मानधन संबंधित खेळाडूंना देण्यात येणार आहे.
"स्थानिक क्रिकेटपटूंच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय जाहीर करताना मला अतिशय आनंद होत आहे. सिनिअर खेळाडू- ६० हजार रुपये (४० हून अधिक सामने खेळलेले), २३ वर्षांखालील खेळाडूंना २३ हजार रुपये आणि १९ वर्षाखालील खेळाडूंना २० हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे", असं ट्विट जय शाह यांनी केलं आहे.
देशांतर्ग क्रिकेट स्पर्धा २१ सप्टेंबर २०२१ पासून पुन्हा एकदा सुरू होणार असल्याचंही जाहीर करण्यात आलं आहे. २१ सप्टेंब रोजी सिनिअर महिला वनडे लीगला सुरुवात होणार आहे. त्यानंतर महिला खेळाडूंच्या वनडे चॅलेंजर ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा २७ ऑक्टोबर २०२१ पासून खेळवली जाणार आहे.