नवी दिल्ली : पूर्वांचल भारतातील मणिपूरमध्ये फुटबॉल, हॉकी, वेटलिफ्टिंग, अॅथलेटिक्स आदी खेळांना जितकी पसंती मिळते, तितकी क्रिकेटला मिळत नाही. त्यामुळेच या भागातून क्रिकेटपटू घडल्याचे ऐकिवात नाही. पण, येथेही क्रिकेटची क्रेझ निर्माण होत आहे. 2018च्या डिसेंबरमध्ये मणिपुरचा जलदगती गोलंदाज रेक्स राजकुमार सिंह पहिल्यांदा चर्चेत आला. जगभरात फार कमी गोलंदाजांना जमलेली अविश्वसनीय कामगिरी त्याने करून दाखवली होती. त्याने 11 धावा देत 10 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता आणि त्याच्या या कामगिरीची दखल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) घेणं भाग पडलं. बीसीसीआयने नुकत्याच जाहीर केलेल्या 19 वर्षांखालील भारतीय संघात रेक्सची निवड करण्यात आली आहे. भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळवणारा रेक्स हा मणिपूरचा पहिलाच खेळाडू ठरला आहे.
कूच बिहार ट्रॉफीत मणिपूर संघाचे प्रतिनिधित्व करताना रेक्सने प्रतिस्पर्धी अरुणाचल प्रदेशचा संपूर्ण संघ तंबूत पाठवला होता. त्याने 9.5 षटकांत 11 धावा देताना दहा विकेट्स घेतल्या होत्या. या दहा विकेट्समध्ये त्याने पाच फलंदाजांना त्रिफळाचीत केले होते, तर तीन फलंदाज पायचीत झाले होते. दोन फलंदाज झेलबाद झाले होते. ही अविश्वसनीय कामगिरी करताना त्याला तीन हॅटट्रिक्स नोंदवण्याची संधी होती, परंतु त्याला अपयश आले. 18 वर्षीय रेक्सला या कामगिरीचे बक्षीस मिळाले. भारताचा महान फलंदाज राहुल द्रविड याच्या मार्गदर्शनाखाली त्याला 19 वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.
पाहा व्हिडीओ...रेक्सला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन चार दिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. याचसोबत निवड समितीने 5 मार्चपासून सुरू होणाऱ्या मालिकेसाठी भारत A व भारत B 19 वर्षांखालील संघही जाहीर केले. या मालिकेत अफगाणिस्तान व दक्षिण आफ्रिकेचे संघ सहभागी होणार आहेत.भारतीय संघ चार दिवसीय सामन्यासाठी : सुरज अहुजा ( कर्णधार व यष्टिरक्षक ), दिव्यांश सक्सेना, वरुण नयनार, अवनीश सुधा, यशस्वी जैस्वाल, वैभव कंडपाल, शौर्या सरण, हृतिक शोकीन, मानव सुथार, मनीषी, सबीर खान, अंशुल कंबोजी, राज्यवर्धन हंगार्गेकर, रोहित दत्तात्रय, रेक्स सिंग, वत्सल शर्मा.