मुंबई : भारताचा माजी कर्णधार आणि विद्यमान राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे अध्यक्ष राहुल द्रविडपुढे आता बीसीसीआय नरमली असल्याचे म्हटले जात आहे. कारण परस्पर हितसंबंध जपल्याच्या मुद्द्यावरून द्रविडला आज बीसीसीआयच्या मुख्य प्रशआसकीय अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी बोलावले होते. पण द्रविडपुढे हे बीसीसीआयचे अधिकारी बॅकफूटवर गेल्याचेच समोर आले आहे.
बीसीसीआयचे अधिकारी डी.के. जैन हे द्रविडची चौकशी करणार होते. द्रविडही यावेळी चौकशीला सामोरा गेला. द्रविडने परस्पर हितसंबंध जपले आहेत, त्यामुळे त्याला बीसीसीआयच्या संलग्न कुठल्याही पदावर काम करण्याचा अधिकार नाही, असे म्हटले जात होते. पण या चौकशीनंतर बीसीसीआयचे अधिकारी नरमले असल्याचेच पाहायला मिळाले.
चौकशीमध्ये मुंबईचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचेही यावेळी उदाहरण देण्यात आले. या उदाहरणानुसार द्रविद हा परस्पर हितसंबंध जपत नसल्याचे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले. द्रविड यावेळी पूर्ण तयारीनिशी चौकशीला सामोरा गेला होता. द्रविडने यावेळी जी उत्तरे दिली ते पाहून बीसीसीआयचे अधिकारी नरमले.
द्रविड हा चेन्नई सुपर किंग्सचे मालक असलेल्या एन. श्रीनिवासन यांच्या इंडियन सिमेंट्स या कंपनीमध्ये एका मोठ्या पदावर आहे. त्यामुळे जर द्रविड राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये एखादे पद भूषवत असेल तर हे परस्पर हितसंबंध जपण्यासारखे आहे, असा आरोप द्रविडवर करण्यात आला होता. पण इंडियन सिमेंट्स या कंपनीमध्ये आपण मोठ्या पदावर असलो तरी त्यांच्याकडून पगार घेत नसल्याचे द्रविडने स्पष्ट केले आणि बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी त्याला क्लीन चीट दिली.