नवी दिल्ली : बीसीसीआयने स्टार इंडियासोबतच्या २०१८ ते २०२३ पर्यंतच्या मीडिया अधिकार करारातील ७८.९० कोटी रुपये माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा करार ३१ मार्च रोजी संपला होता. हा करार १०२ सामन्यांसाठी ६१३८.१ कोटींचा होता. तथापि बीसीसीआयने पाच वर्षांच्या करार कालावधीत १०३ सामने खेळविले. त्यामुळे एक सामना करारातून वगळल्याने उपरोक्त रक्कम माफ करण्यात आली.
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, ५ एप्रिल २०१८ ला झालेल्या स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या करारानुसार बीसीसीआयने स्टार इंडियाला एका सामन्याची सूट दिली आहे. या कालावधीत सामन्यांची संख्या १०३ नव्हे तर १०२ इतकीच विचारात घेण्यात आली. ‘१०२ सामन्यांचा करार असल्याने आम्ही तितक्याच सामन्यांचे शुल्क भरू,’ असे स्टार इंडियातर्फे सांगण्यात आले.