BCCI, Team India: शुक्रवारची सकाळ क्रिकेट रसिकांसाठी काहीशी धक्कादायक ठरली. भारताचा युवा क्रिकेटपटू रिषभ पंत (Rishabh Pant) याचा अपघात झाला. त्याला गंभीर दुखापत झाली असली तरी त्याची प्रकृती स्थिर असल्याने साऱ्यांनाच हायसे वाटले. सरते वर्ष अशा आठवणी देत असताना, नव्या वर्षात टीम इंडिया कात टाकणार असल्याचे संकेत मिळत आहेत. नव्या वर्षात टीम इंडियाला नवे सिलेक्टर्स मिळणार आहेत. टी२० विश्वचषकात भारताच्या लाजिरवाण्या पराभवानंतर BCCIने आपल्या नवीन निवड समितीचा (Selection Committee) शोध सुरू केला होता. त्यांनी नवीन पॅनलसाठी अर्ज मागवले होते. नवीन वर्षात बीसीसीआय सर्वात आधी या मुद्द्यावर निर्णय घेणार आहे. सध्या मिळालेल्या माहितीनुसार, २ जानेवारीला BCCIची CAC म्हणजे क्रिकेट सल्लागार समिती अर्जदारांची मुलाखत घेऊ शकते.
BCCI ने १८ नोव्हेंबर रोजी निवड समितीच्या सर्व ५ सदस्यांचे अर्ज जाहीर केले होते. नवीन अर्जांसाठी बोर्डाने २८ नोव्हेंबरपर्यंत मुदत ठेवली होती. बर्याच माजी खेळाडूंनी अर्ज केले होते. परंतु त्यापैकी काहींनाच मुलाखतीसाठी निवडण्यात आले असल्याची चर्चा आहे. आता या अर्जदारांना पुढील टप्प्याला म्हणजेच थेट मुलाखतींना सामोरे जावे लागणार आहे.
सल्लागार समिती २ जानेवारीला मुलाखत घेणार!
क्रिकेट सल्लागार समिती (CAC) २ जानेवारी रोजी निवडलेल्या लोकांची मुलाखत घेईल. अशोक मल्होत्रा या समितीचे अध्यक्ष आहेत. मुलाखतीच्या एक-दोन दिवसानंतर नावे जाहीर केली जातील. भारताला ३ जानेवारी पासून श्रीलंके विरूद्धच्या मालिकेसाठीचे यजमानपद भूषवायचे आहे. यासाठी संघ जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे नवीन निवड समिती ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघ निवडीपासून कामाला सुरुवात करेल, असे सांगितले जात आहे.
शर्यतीत अनेक दिग्गज खेळाडूंची नावे
भारताचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद, डोडा गणेश, माजी यष्टीरक्षक नयन मोंगिया, माजी डावखुरा फिरकी गोलंदाज मनिंदर सिंग, निखिल चोप्रा, शिवसुंदर दास, अजय रात्रा यांच्यासह काही प्रसिद्ध देशांतर्गत क्रिकेटपटू यांची नावे शर्यतीत मोठी नावे आहेत. माजी निवडकर्ता चेतन शर्मा यांचेही नाव यात पुढे आले आहे. अशा वेळी BCCI पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवते की नाही, हे पाहण्यासारखे असणार आहे.