BCCI Central Contracts: भारताचा माजी कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा यांना बीसीसीआयच्या वार्षिक करार यादीत डिमोशन होण्याची शक्यता आहे. या दोन्ही अनुभवी फलंदाजांना २०२१ मध्ये 'बीसीसीआय'ने अ श्रेणीत करारबद्ध करत त्यांना प्रत्येकी ५ कोटी रुपये मानधन देण्यात आले. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, दोन्ही खेळाडूंचे ब श्रेणीत 'डिमोशन' केलं जाणार असल्याची चर्चा असून या श्रेणीतील खेळाडूंना प्रत्येकी ३ कोटी रुपयांचे मानधन दिले जाते. रहाणे आणि पुजारा या दोघांनाही गेल्या अनेक दिवसांपासून फारशा धावा करता आलेल्या नाहीत. त्यामुळे BCCI मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आफ्रिका दौऱ्यावर रहाणे आणि पुजारा यांना प्लेईंग ११ मध्ये स्थान मिळेल की नाही याबाबत साशंकता होता. पण संघ व्यवस्थापनाने त्यांना पाठिंबा दर्शवत तिन्ही सामन्यांमध्ये संधी दिली. असं घडलं तरीही दोन्ही खेळाडूंना संधीचं सोनं करता आलं नाही. रहाणेने ३ कसोटीत २३ च्या सरासरीने १३६ धावा केल्या, तर पुजाराने १२४ धावा केल्या. श्रेयस अय्यर आणि हनुमा विहारी यांसारख्या युवा खेळाडूंना बाजूला ठेवून या दोघांना संधी देण्यात आली होती. पण त्यांना ती संधी नीट वापरता आली नाही. त्याच्यासोबतच टीम इंडियाच्या दोन स्टार खेळाडूंना बढतीची अपेक्षा असूनही त्यांना प्रमोशन नाकारलं जाऊ शकतं असंही बोललं जात आहे.
रिपोर्टनुसार, स्टार फलंदाज केएल राहुल आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत यांना केंद्रीय करार यादीत बढती मिळणार नाही, अशीही चर्चा आहे. हे दोन्ही खेळाडू तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळतात त्यामुळे त्यांना A+ श्रेणीमध्ये बढती देण्याची शक्यता होती, पण आता मात्र तसं होणार नाही असं सांगितलं जात आहे. राहुलने कसोटी संघात आपले स्थान निश्चित केले असून दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने संघाचे नेतृत्व केले. तसेच, वन डे मालिकेतही तो कर्णधार होता. ऋषभ पंतनेही सर्व फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केली. तो टीम इंडियाचा भरवशाचा यष्टीरक्षक आहे. परंतु असे असूनही रिपोर्टनुसार या दोघांना बढती मिळणं सध्या तरी शक्य नसल्याचं सांगितलं जात आहे. यामागे कारण काय हे अस्पष्टच आहे.