नवी दिल्ली :
आयर्लंडविरुद्ध दोन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी बीसीसीआयने बुधवारी भारतीय संघ जाहीर केला. या संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे सोपविण्यात आले. रोहित आणि इतर वरिष्ठ खेळाडू इंग्लंडविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळणार असल्याने या दौऱ्याचा भाग नसतील. हार्दिककडे नेतृत्वाची सूत्रे सोपवित बीसीसीआयने वर्षभरात सहा कर्णधार बदलले आहेत.
६३ वर्षानंतर पुनरावृत्ती२०२२ मध्ये भारताने सहा कर्णधार बदलले. ६३ वर्षांआधी १९५९ ला देखील भारतीय संघाचे नेतृत्व पाच खेळाडूंनी केले होते. त्यावेळी हेमू अधिकारी, दत्ता गायकवाड, विनू मंकड, गुलाबराय रामचंद आणि पंकज राॅय हे कर्णधार होते. त्यावेळी केवळ कसोटी हा एकमेव प्रकार अस्तित्वात होता.
श्रीलंका दौऱ्यात ‘गब्बर’कडे नेतृत्वगतवर्षी भारतीय संघ विराट कोहलीच्या नेतृत्वात इंग्लंड दौऱ्यावर असताना शिखर धवनच्या नेतृत्वात दुसरा संघ श्रीलंका दौऱ्यावर गेला होता. यावेळी धवनकडे संघाची सूत्रे सोपविण्यात आली होती. या दौऱ्यात भारत टी-२० मालिकेत १-२ ने पराभूत झाला होता.
रोहित युगाची सुरुवातटी-२० विश्वचषकानंतर बीसीसीआयने रोहित शर्माची टी-२० संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली. रोहितच्या नेतृत्वाखालील संघाने न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्ध मालिका खेळल्या. या सर्वच मालिकांमध्ये भारताने विजय नोंदविला. पूर्णवेळ कर्णधार झाल्यापासून रोहितने एकही टी-२० सामना गमावलेला नाही, हे विशेष.
कोहलीच्या नेतृत्वात टी-२० विश्वचषक२०२१ च्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघ विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळला. कोहलीने स्पर्धेआधीच टी-२० चे कर्णधारपद सोडण्याची मोठी घोषणा केली होती. पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून सुरुवातीचे दोन सामने हरल्याने संघ बाद फेरीतच स्पर्धेबाहेर झाला. नंतरचे तीन सामने मात्र भारताने जिंकले होते.
राहुल, ऋषभ यांनाही संधीदक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी नियमित कर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्यात येताच राहुलकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवली. मात्र, स्टार सलामीवीर दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला. राहुलने माघार घेताच नेतृत्वाची माळ यष्टिरक्षक ऋषभ पंतच्या गळ्यात पडली आहे. त्याने सुरुवातीचे दोन सामने गमावले. तिसऱ्या सामन्यात भारतीय संघ फिरकीच्या बळावर जिंकला. ऋषभ मात्र फलंदाजीत आणि नेतृत्व गुणात चक्क अपयशी ठरला.