Hardik Pandya vs BCCI, Chetan Sharma : भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि BCCI निवड समिती यांच्यात काहीतरी वाद असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून रंगल्या आहेत. टी२० वर्ल्ड कपसाठी त्याची निवड वादातीत ठरल्यानंतर हार्दिक पांड्याला पुन्हा भारतीय संघात स्थान मिळाले नाही. याबाबत हार्दिकला प्रश्न विचारला असता, कुटुंबाला वेळ देण्यासाठी मी क्रिकेटपासून दूर आहे असं त्याने सांगितलं. 'Mumbai Indians मध्येही त्याला कर्णधारपद हवं होतं आणि ते न मिळाल्याने मुंबईने त्याला करारमुक्त केलं', अशीही एक चर्चा मधल्या काळात कानावर आली होती. परंतु शनिवारी टीम इंडियाचे निवड समिती प्रमुख चेतन शर्मा यांच्या पत्रकार परिषदेत काही वेगळीच बाब दिसून आली.
चेतन शर्मा यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत श्रीलंकेविरूद्धच्या टी२० आणि कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर केला. रोहित शर्माच्या खांद्यावर तीनही फॉरमॅटची जबाबदारी दिली. यावेळी पत्रकारांनी हार्दिक पांड्या रणजी क्रिकेट का खेळत नाही? असा सवाल करण्यात आला. त्यावर चेतन शर्मा यांनी थोडंसं उखडतच उत्तर दिलं.
"हार्दिक पांड्या हा भारतीय क्रिकेट संघाचा एक खूप महत्त्वाचा घटक होता यात वादच नाही. पण तो सातत्याने दुखापतग्रस्त झाला, त्यामुळे त्याला संघातून बाहेर करण्यात आले. जर हार्दिक १०० टक्के फिट असेल, गोलंदाजी करण्यास सक्षम असेल आणि सामना खेळण्यासाठी तयार असेल तर आम्ही त्याचा नक्की विचार करू. जर एखादा खेळाडू रणजी सामने खेळत नसेल तर त्यात निवड समिती काहीही बोलू शकत नाही. राज्य क्रिकेट संघटनांच्या बाबींमध्ये निवड समिती पडत नाही. हार्दिक पांड्या रणजी का खेळत नाही हे तुम्ही त्यालाच विचारलं पाहिजे", असं चेतन शर्मा म्हणाले.
"निवड समिती अध्यक्ष म्हणून मी एक सांगतो की रणजी सामन्यात जे खेळाडू खेळतात त्यांच्या खेळावर आम्ही कायम लक्ष ठेवून असतो. खेळाडू रणजी सामने खेळतात आणि मैदान गाजवतात हे पाहून आम्हाला आनंद होतो", असंही चेतन शर्मा यांनी स्पष्ट केले.