नवी दिल्ली : सध्या भारतीय संघ मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरूद्ध (IND vs SA) 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ टी-20 विश्वचषकासाठी (T20 World Cup 2022) ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. खरं तर आफ्रिकेविरूद्ध टी-20 मालिकेनंतर एकदिवसीय मालिका देखील होणार आहे. भारतीय संघाच्या टी-20 विश्वचषक संघात संजू सॅमसनचे नाव नाही, त्यामुळे त्याचे चाहते खूप निराश झाले आहेत. टी-20 विश्वचषकापूर्वी खेळल्या गेलेल्या काही मालिकांमध्ये संजूला संधी देण्यात आली होती, त्यामुळे चाहत्यांना अपेक्षा होती की संजूला नक्कीच ऑस्ट्रेलियाचे तिकीट मिळेल पण निवडकर्त्यांनी यावेळी देखील त्याला डावलले. मात्र आता बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी एक वक्तव्य करून सर्वांचे लक्ष वेधले आहे.
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या म्हणण्यानुसार, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार अजूनही भारतीय संघात आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या आगामी एकिदिवसीय मालिकेत देखील संजू खेळणार आहे. अशा परिस्थितीत संजू सॅमसनला टी-20 विश्वचषकात संधी न देऊन निवडकर्त्यांनी किती मोठी चूक केली आहे, हे दाखवून द्यायची त्याच्याकडे सुवर्णसंधी असणार आहे. गागुंलींनी म्हटले, "संजू सॅमसन शानदार प्रदर्शन करत आहे. तो भारतासाठी खेळला मात्र विश्वचषकाला मुकला आहे. तो अद्यापही भारतीय संघातच आहे. तो आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय संघाचा भाग आहे. तसेच त्याने आयपीएल फ्रँचायझीमध्ये चांगली कामगिरी केली आहे आणि तो कर्णधार देखील आहे."
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गागुंली यांनी केलेल्या या विधानामुळे संजू सॅमसनच्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र टी-20 विश्वचषकानंतर होणाऱ्या आगामी सामन्यांमध्ये सॅमसनला संधी मिळते की नाही हे पाहण्याजोगे असेल. भारतीय संघ सध्या आफ्रिकेविरूद्ध टी-20 मालिका खेळत आहे. 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवून यजमान संघाने 1-0 ने आघाडी घेतली आहे.
भारताची विजयी सलामी
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामधील 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून भारताने विजयी सलामी दिली. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अर्शदीप सिंग आणि दीपक चहर यांच्या आक्रमक माऱ्यासमोर आफ्रिकी फलंदाज पूर्णपणे चितपट झाले. दीपक चाहरने पहिल्याच षटकात आफ्रिकी कर्णधार टेम्बा बवुमाचा त्रिफळा उडवला. तर अर्शदीप सिंगने घातक सलामीवीर क्विंटन डीकॉकला तंबूत पाठवले. त्याने 4 षटकांत एकूण 32 धावा देऊन 3 बळी पटकावले. दक्षिण आफ्रिकेने 20 षटकांत 8 बाद 106 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताकडून सूर्यकुमार यादव आणि लोकेश राहुल यांनी अर्धशतकी खेळी करून विजयावर शिक्कामोर्तब केला.
Web Title: BCCI chief Sourav Ganguly gives big statement on Sanju Samson's Team India future
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.