Join us

Sourav ganguly: "जर माझ्या मुलीला क्रिकेट खेळायचे असेल तर..." झुलन गोस्वामीचं कौतुक करताना दादा म्हणाले... 

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी झुलन गोस्वामीचे कौतुक केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 13:08 IST

Open in App

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav ganguly) यांनी भारतीय संघाची अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामीचे (Jhulan Goswami) कौतुक केले आहे. भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून झुलन गोस्वामी तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटची मालिका खेळत आहे. 25 सप्टेंबर रोजी होणाऱ्या तिसऱ्या सामन्यानंतर झुलन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. इंग्लंडविरूद्धची एकदिवसीय मालिका जिंकून लॉर्ड्समध्ये झुलन गोस्वामीला निवृत्तीची भेट देण्यासाठी आम्ही तयार असल्याचे कर्णधार हरमनप्रीत कौरने म्हटले आहे.

भारतीय संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात यजमान इंग्लिश संघाला पराभूत करून मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे. लक्षणीय बाब म्हणजे भारताने तब्बल 23 वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर इंग्लंडच्या धरतीवर एकदिवसीय मालिका जिंकली आहे. भारताने शेवटच्या वेळी 1999 मध्ये इंग्लंडमध्ये एकदिवसीय मालिका जिंकली होती. झुलन गोस्वामीने 20 वर्षाच्या आपल्या क्रिकेट कारकिर्दीत 12 कसोटी (44 बळी), 202 एकदिवसीय सामने (253 बळी) आणि 68 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण 56 बळी पटकावले आहेत.

भारताची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी शनिवारी आपल्या कारकिर्दीतील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. मिताली राज सोबत भारतीय क्रिकेटला नव्या उंचीवर पोहचवणारी झुलन गोस्वामी भारतीय क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. तिचे अभिनंदन करताना बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी झुलनला एक दिग्गज खेळाडू म्हणून सन्मानित केले आहे.

झुलन गोस्वामीचे केले कौतुक गांगुली यांनी कोलकाता येथे एका कार्यक्रमात बोलताना म्हटले, "झुलन गोस्वामी ही एक दिग्गज खेळाडू आहे. तिने महिला क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक बळी पटकावले आहेत. ती बंगालमधील चकदाह येथील रहिवाशी आहे. माझी तिच्याशी नेहमी चर्चा होत असते. महिला क्रिकेटच्या विकासासाठी ती नेहमी तत्पर असते. मी स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर यांच्याशी देखील चर्चा केली आहे." आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 350 हून अधिक बळी घेणारी झुलन गोस्वामी क्रिकेटला रामराम करत आहे. 39 वर्षीय झुलनने 6 वेळा एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. "जर माझ्या मुलीला क्रिकेट खेळायचे असेल तर मी तिला झुलन सारखी हो असा सल्ला देईन. मात्र दुर्दैवाने ती क्रिकेट खेळत नाही. मी तिला शुभेच्छा देतो", असे गांगुलींनी अधिक म्हटले. 

 

टॅग्स :सौरभ गांगुलीझुलन गोस्वामीभारतीय महिला क्रिकेट संघबीसीसीआयइंग्लंड
Open in App