नवी दिल्ली: क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावरील बहिष्काराबद्दलचा निर्णय प्रशासकीय समितीनं मोदी सरकारवर सोपवला आहे. या प्रकरणी सरकार जो काही निर्णय घेईल, तो बीसीसीआयला मान्य असेल, असं प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी सांगितलं. सरकारसोबत चर्चा करुन याबद्दलचा निर्णय घेतला जाईल, असंदेखील राय म्हणाले. दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणाऱ्या देशाशी भविष्यात संबंध ठेवायचे का, याबद्दल बीसीसीआय आयसीसीकडे चिंता व्यक्त करणार असल्याची माहिती राय यांनी दिली.विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याबद्दलचा निर्णय घेण्यासाठी प्रशासकीय समितीनं आज बैठक घेतली. सरकारसोबत चर्चा करुन याविषयीचा अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती विनोद राय यांनी माध्यमांना दिली. 'विश्वचषक स्पर्धा अद्याप तीन महिने दूर आहे. त्यामुळे याबद्दलचा निर्णय सरकार घेईल. मात्र पाकिस्तानशी संबंधित चिंता आम्ही आयसीसीकडे व्यक्त करणार आहोत. दहशतावादाला प्रोत्साहन देणाऱ्या देशाशी भविष्यात संबंध ठेवायचे का, यावर आयसीसीच्या बैठकीत चर्चा होईल,' असं राय म्हणाले. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात पाकिस्तानविरोधात संतापाची लाट आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरु लागली आहे. अनेक माजी खेळाडूंनीदेखील याबद्दल स्पष्ट आणि कठोर भूमिका घेतली आहे. क्रिकेटचा सामना देशापेक्षा मोठा नाही, अशी भावना अनेक खेळाडूंनी व्यक्त केली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालण्याची मागणी हरभजन सिंह, सौरव गांगुली आणि मोहम्मद अजहरुद्दीन यांनी केली आहे. मात्र याबद्दलचा निर्णय सरकार घेईल, असं म्हणत बीसीसीआयनं स्पष्ट केलं आहे. विश्वचषक स्पर्धेच्या वेळापत्रकानुसार 16 जूनला मॅन्चेस्टरमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार आहे.