बीसीसीआयची वार्षिक केंद्रीय करार यादी जाहीर झाल्यापासून लक्ष वेधून घेणारी दोन नावे म्हणजे श्रेयस अय्यर आणि ईशान किशन. हे दोन्ही स्टार खेळाडू गेल्या काही काळापासून भारतीय संघात सहभागी होते, तरीही त्यांना बीसीसीआयच्या करारातून बाहेर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे श्रेयस अय्यर आणि ईशान किशनची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना केंद्रीय करारातून काढून टाकण्यामागे कोणतेही अधिकृत कारण समोर आले नसले तरी बीसीसीआयच्या प्रसिद्धीपत्रकात ईशान आणि श्रेयसच्या प्रकरणाबाबत महत्वाचे संकेत देण्यात आले होते. बीसीसीआयने म्हटलं होतं की सर्व खेळाडूंनी राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व नसताना देशांतर्गत क्रिकेटमध्ये भाग घेण्यास प्राधान्य द्यावे.
ईएसपीएन क्रिकइन्फोच्या अहवालात दावा करण्यात आला आहे की भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेदरम्यान भारतीय क्रिकेट संघ व्यवस्थापनाने ईशान किशनशी संपर्क साधला होता. यावेळी ईशान किशनने उत्तर दिले की, तो अद्याप तयार नाही. त्याच्या अनुपस्थितीत ध्रुव जुरेलला संधी मिळाली आणि त्याने चौथ्या कसोटीत सामनावीराचा पुरस्कार पटकावला. आता ईशानचे पुनरागमन अवघड वाटत आहे. अलीकडेच रोहितनेही नाव न घेता ईशान आणि श्रेयसवर निशाणा साधला होता. रोहित म्हणाला होता- ज्यांना भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची आणि संघाकडून खेळण्याची भूक आहे, त्यांनाच संधी दिली जाईल.
यापूर्वी ईशान किशनने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या मालिकेतून आपले नाव मागे घेतले होते. त्यानंतर बीसीसीआयने १७ डिसेंबरला सांगितले होते - 'ईशानने बीसीसीआयला वैयक्तिक कारणांमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतून मुक्त करण्याची विनंती केली आहे. यानंतर या यष्टीरक्षकाला कसोटी संघातून मुक्त करण्यात आले आहे. राष्ट्रीय संघापासून दूर राहिल्यानंतर ईशानने देशांतर्गत क्रिकेट खेळणे अपेक्षित होते, परंतु यष्टिरक्षक फलंदाजाने रणजी ट्रॉफी सामन्यांना अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला. भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितले होते की, भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी ईशानला देशांतर्गत क्रिकेट किंवा कोणतीही स्पर्धा खेळण्याची गरज आहे. मात्र, इशान किशनने या सूचनेकडे दुर्लक्ष केले.
Web Title: BCCI contacted Ishaan Kishan during the England series, See what he said
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.