मुंबई - डोपिंग प्रकरणात दोषी आढळलेल्या क्रिकेटपटू अभिषेक गुप्ता याचा संघात समावेश करण्याची चूक भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सुधारली आहे. त्याचा जागी दुलीप करंडक स्पर्धेतील भारत रेड संघात विदर्भाच्या अक्षय वाडकरची निवड करण्यात आली आहे. सोमवारी बीसीसीआयने दुलीप करंडक स्पर्धेसाठी भारत रेड, भारत ब्लू आणि भारत ग्रीन संघ जाहीर केले. त्यात रेड संघात डोपिंग प्रकरणात दोषी आढळलेल्या अभिषेक गुप्ताला स्थान देण्यात आले होते. डोपिंग विरोधी समितीने बीसीसीआयला याबाबत माहिती दिली आणि त्यांनी त्वरित अभिषेकला संघातून डच्चू दिले. दुलीप करंडक स्पर्धा 17 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. डोपिंग विरोधी समितीने अभिषेकला आठ महिन्यांसाठी निलंबित करण्यात आल्याची माहिती आम्हाला दिली. त्याची ही बंदी 14 सप्टेंबरला संपणार आहे. त्यामुळे भारत रेड संघात त्याच्या जागी अक्षयचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती बीसीसीआयने दिली. सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेदरम्यान अभिषेकची चाचणी करण्यात आली होती आणि त्यात त्याच्या लघवीच्या नमुन्यात प्रतिबंधीत द्रव्य आढळले होते. त्यानंतर त्याला आठ महिन्यासाठी निलंबित करण्यात आले होते.