नवी दिल्ली : भारतीय संघाचे संपूर्ण लक्ष सध्या इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या कसोटी मालिकेवर आहे. अशात कर्णधार कोहली आणि बीसीसीआयच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये आगामी टी २० विश्वचषकाबाबत चर्चा झाली. लॉर्डसमध्ये दुसरी कसोटी जिंकल्यावर कोहलीवरील दबाव खूप कमी झाला आहे. मात्र त्याला माहीत आहे की, कर्णधार म्हणून त्याचे भविष्य हे युएईत होणाऱ्या टी२० विश्वचषकातील संघाच्या कामगिरीवर अवलंबून आहे.
भारताच्या टी२० विश्वचषकातील अभियानाची सुरुवात ही पाकिस्तानविरोधातील २४ ऑक्टोबरच्या सामन्यापासून होणार आहे.
याबाबत माहिती मिळाली आहे की, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दुसऱ्या कसोटी दरम्यान कर्णधार म्हणून औपचारीक बैठक आयोजित केली. त्यात टी२० विश्वचषकातील विविध पैलुंवर चर्चा करण्यात आली. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी कोहलीशी चर्चा केली. मात्र त्यांच्यातील चर्चेची माहिती देणे योग्य होणार नाही. मात्र टी२० विश्वचषकासाठी खूप कमी वेळ शिल्लक आहे. आणि भारताला आयपीएलच्या आधी मर्यादित षटकांचा एकही सामना खेळता येणार नाही. त्यामुळे चर्चा हिच होती की या स्पर्धेसाठी रणनीति कशी असली पाहिजे.’
भारत १४ सप्टेंबरपर्यंत कसोटी सामना खेळणार आहे. आणि त्यानंतर खेळाडू आयपीएलमध्ये आपल्या फ्रेंचायझीसाठी खेळतील. अशाप्रसंगी अधिकाऱ्यांनी कोहलीशी चर्चा करणे यात विशेष काही नसल्याचेही या अधिकाऱ्याने म्हटले.
महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वात भारताने २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी मिळवली होती. त्यानंतर भारताला एकही आयसीसी जेतेपद मिळवता आलेले नाही. त्यामुळे कोहली आणि चेतन शर्मा यांच्याकडून संघाला हिच आशा आहे की ते यावेळी भारताला आयसीसी स्पर्धेचे जेतेपद मिळवून देतील.
कोहलीच्या नेतृत्वाची विश्वचषकात होणार कसोटी
- भारताने विराट कोहलीच्या नेतृत्वात २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना, २०१९ वनडे विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी आणि या वर्षाचा आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिप कसोटी सामना गमावला आहे.
- कोहलीच्या नेतृत्वात संघाला एकही आयसीसी विजेतेपद मिळवता आलेले नाही. गेल्या काही काळापासून कसोटी क्रिकेटमध्ये देखील संघ संयोजन हा कळीचा मुद्दा ठरत आहे.
- २०१९ मध्ये देखील वनडे विश्वचषकात भारताला मधली फळी निश्चित करता आली नव्हती. संघ निवडीबाबतही काही मुद्दे आधी सोडवावे लागतील.
- त्यात गोलंदाजांवरील अतिरिक्त भार, अष्टपैलू खेळाडूंची निवड, फिरकीपटूंची निवड यांचा समावेश आहे. हे सर्व प्रश्न निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मा, कर्णधार विराट कोहली, प्रशिक्षक रवी शास्त्री, भारत अरुण यांना सोडवावे लागतील.
Web Title: BCCI discusses T20 strategy with Kohli; Interview by Sourav Ganguly, Jai Shah
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.