Join us  

भारत पाकिस्तानला पुन्हा गुडघे टेकण्यास भाग पाडणार; चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५बाबत अपडेट्स

बीसीसीआयने पाकिस्तानातील सुरक्षेसंदर्भात शंका उपस्थित केली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 4:52 PM

Open in App

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५चे यजमानपद पाकिस्तानला मिळाले आहे. त्याची तयारीही जोरात सुरू आहे. नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (ICC) दुबई मुख्यालयात बैठक झाली. यामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५च्या यजमानपदासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डसोबत करारही करण्यात आला आहे. त्यामुळे पाकिस्तानचे यजमानपद निश्चित झाले आहे. मात्र चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाला पाकिस्तानला पाठविण्याबाबत बीसीसीआय अनुकूल दिसत नाही. बीसीसीआयने पाकिस्तानातील सुरक्षेसंदर्भात शंका उपस्थित केली आहे. 

दरम्यान, पाकिस्तानला पुन्हा एकदा बीसीसीआयची भीती वाटत आहे. वास्तविक, आशिया चषक २०२३चे यजमानपदही पाकिस्तानकडे होते. पण त्यानंतर बीसीसीआयने आपला संघ पाकिस्तानला पाठवण्यास नकार दिला होता. यानंतर, पीसीबीला हायब्रीड मॉडेल अंतर्गत आशिया चषक आयोजित करणे भाग पडले होते. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५च्या स्पर्धेत भारत पाकिस्तानला पुन्हा गुडघे टेकण्यास भाग पाडणार असल्याची चर्चा रंगली आहे.

२०२३मधील आशिया चषकमधील भारताचे सामने श्रीलंकेत खेळवले गेले. त्यावेळी आशिया कपच्या १३ पैकी फक्त ४ सामने पाकिस्तानात झाले होते. तर फायनलसह ९ सामने श्रीलंकेत झाले. यावेळीही अशीच भीती पाकिस्तानला सतावू लागली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेतसाठी देखील भारत आपला संघ पाठवण्यास नकार देईल, अशी भीती पाकिस्तान क्रिकेट बोर्डला वाटू लागली आहे. 

चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने यूएईमध्ये होऊ शकतात-

पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, नुकतेच पीसीबी चेअरमन झका अश्रफ आणि एमिरेट्स क्रिकेट बोर्ड (ECB)चे उपाध्यक्ष खालिद अल जौरानी यांच्यात संभाषण झाले. यादरम्यान अशीही चर्चा झाली आहे की, जर भारतीय संघाने पाकिस्तानच्या दौऱ्यावर येण्यास नकार दिला तर यूएईमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे काही सामने होऊ शकतात.

भारत न आल्यास आयसीसी उचलेल खर्च 

क्रिकेट पाकिस्तानाच्या सूत्रांनी सांगितले की, जर भारताने आपला संघ पाकिस्तान दौऱ्यावर पाठवला नाही, तर अशा परिस्थितीत आयसीसीलाच अतिरिक्त खर्च सहन करावा लागू शकतो. चॅम्पियन्स ट्रॉफीचे काही सामने यूएईमध्ये घेण्याबाबत अजूनही जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, ते त्यावेळीच्या परिस्थितीवर अवलंबून असेल. विशेषत: सुरक्षेच्या मुद्द्यांवर पीसीबीने कठोर भूमिका घेतली असून कोणत्याही संघाने पाकिस्तान दौर्‍यावर जाण्यास नकार दिल्यास आयसीसीला निःपक्षपातीपणे निर्णय घ्यावा लागेल. 

एकूण ७ संघांचा समावेश-

नोव्हेंबर २०२१ मध्ये आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दोन आवृत्त्यांसह ( २०२५ आणि २०२९) नवीन सायकलमध्ये ( २०२४-३१) पुरुष आणि महिला संघांसाठी अनेक जागतिक स्पर्धांचे अनावरण केले होते.  आयसीसीने म्हटले होते की चॅम्पियन्स ट्रॉफी ही आठ संघांची स्पर्धा असेल आणि मागील आवृत्त्यांचे अनुसरण करून ४-४ संघांचे दोन गट, उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी असे या स्पर्धेचे स्वरुप असेल. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या २०१३ व २०१७ आवृत्त्यांसाठी कट-ऑफ तारखेला वन डे क्रमवारीतील शीर्ष आठ संघ स्पर्धेसाठी पात्र ठरले होते. पण आता २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी या वर्ल्ड कप स्पर्धेतील  अव्वल सात संघांचा समावेश करण्याच्या निर्णयाला ICC च्या मुख्य कार्यकारी समितीने मान्यता दिली होती त्यानंतर ICC बोर्डाने या शिफारसीला मान्यता दिली आहे. 

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये पात्र ठरलेले संघ - भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान ( यजमान), अफगाणिस्तान, इंग्लंड  

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघआयसीसी