( Marathi News ) इशान किशनला ट्वेंटी-२० संघातून अचानक वगळण्याचे प्रकरण ताजे असताना आता लोकेश राहुल ( KL Rahul) याला कसोटीत यष्टिरक्षक म्हणून बीसीसीआयला पाहायचे नसल्याचे वृत्त समोर येत आहे. भारतीय संघ २५ जानेवारीपासून इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. पण, या मालिकेत यष्टिंमागे लोकेश राहुल दिसण्याची शक्यता कमी आहे. त्यासाठी बीसीसीआयनेइशान किशनला सज्ज राहण्यास सांगितले आहे. इशानला रणजी करंडक स्पर्धेत खेळून स्वतःचा फिटनेस सिद्ध करण्याच्या सूचना बीसीसीआयने केल्या आहेत.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून मानसिक थकवा सांगून इशानने सुट्टी घेतली. पण, त्याची अफगाणिस्तानविरुद्धच्या ट्वेंटी-२० संघात निवड न केल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. काहींच्या वृत्तानुसार इशानच्या बेजबाबदार वागणुकीमुळे संघ व्यवस्थापनाने त्याची निवड केली नाही. पण, भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने या अफवा असल्याचे स्पष्ट केले. त्याच्यावर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई केली नसल्याचे द्रविड म्हणाला.
"त्याच्यावर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई केलेली नाही. इशान किशन निवडीसाठी उपलब्ध नव्हता. इशानने विश्रांतीची विनंती केली, जी आम्ही दक्षिण आफ्रिकेत मान्य केली. आम्ही त्याला पाठिंबा दिला. त्याने अद्याप निवडीसाठी उपलब्ध असल्याचे आम्हाला सांगितलेले नाही. जेव्हा तो उपलब्ध असेल तेव्हा तो देशांतर्गत क्रिकेट खेळेल आणि स्वत:ला निवडीसाठी उपलब्ध करेल,” असे द्रविडने सांगितले.
रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की किशन 'मानसिक थकवा' साठी दिलेल्या सुट्टीचा वापर करून दुबईमध्ये पार्टी करताना दिसल्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापन खूश नव्हते.
केएल राहुल कसोटीचा यष्टिरक्षक म्हणून का नको ?कसोटी क्रिकेटमध्ये परतल्यावर राहुलने त्याच्या नवीन भूमिकेत यष्टिरक्षक आणि मधल्या फळीतील फलंदाज म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली. त्याला मात्र इंग्लंडविरुद्ध तिच भूमिका मिळणार नाही. क्रिकबझच्या म्हणण्यानुसार, भारतीय संघ व्यवस्थापन राहुलवर कसोटीत यष्टिरक्षकाचा भार टाकू इच्छित नाही, विशेषत: भारतीय खेळपट्ट्यांवर जिथे चेंडू वळणे अपेक्षित आहे. त्यांना रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांना हाताळण्यासाठी एक विशेषज्ञ यष्टिरक्षक हवा आहे. पण मधल्या फळीतील राहुलचे स्थान निश्चित झाले आहे. त्याला श्रेयस अय्यरच्या पुढे पाचव्या क्रमांकासाठी निवडले जाण्याची शक्यता आहे.
डिसेंबर २०२२ मध्ये कार अपघातात झालेल्या दुखापतीतून रिषभ पंत अद्याप पूर्णपणे बरा झालेला नाही आणि वृद्धीमान साहाला सोडून निवड समितीने पुढे जाण्याचा निर्णय केव्हाच घेतला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे किशनचा पर्याय आहे.