bcci earnings from ipl 2023 : आयपीएलच्या माध्यमातून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय मोठी कमाई करत असते. गतवर्षी बीसीसीआयने आयपीएलच्या माध्यमातून सर्वाधिक कमाई केली. आयपीएल २०२३ च्या हंगामातून ५१२० कोटींहून अधिकची कमाई झाल्याचे समजते. रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयने आयपीएल २०२२ मधून कमावलेल्या २३६७ कोटी रुपयांच्या रकमेपेक्षा ११६% अधिक कमाई केली आहे. बीसीसीआयच्या एकूण उत्पन्नात वाढ झाली असली तरी यासोबत बीसीसीआयच्या खर्चातही मोठी वाढ झाली आहे. आयपीएल २०२२-२३ च्या वार्षिक अहवालानुसार, ६६ टक्क्यांनी खर्चात वाढ झाली आहे ज्यामध्ये कार्यक्रम आयोजित करण्यासाठी ६६४८ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत, अशी माहिती इकॉनॉमिक टाइम्सने दिली.
बीसीसीआयच्या कमाईचे अनेक स्त्रोत आहेत. कमाईबद्दल बोलायचे झाले तर बीसीसीआयने आयपीएलच्या नवीन मीडिया राइट्समधून सर्वाधिक पैसे कमावले आहेत. याशिवाय बोर्डाला स्पॉन्सरच्या माध्यमातूनही मोठी रक्कम मिळते. खरे तर २०२३-२७ साठी नवीन मीडिया राइट्स ४८,३९० कोटी रुपयांचे आहेत. डिस्ने स्टारने २०२१ मध्ये २३,५७५ कोटी रुपयांना आयपीएल टीव्हीचे राइट्स विकत घेतले होते. तर Jio Cinema ला २३,७५८ कोटी रुपयांचे डिजिटल राइट्स मिळाले आहेत. आयपीएलच्या नावाच्या स्पॉन्सरशिपचे राइट्स टाटा सन्सला २५०० कोटी रुपयांना विकले गेले आहेत.
BCCI मालामाल दरम्यान, आयपीएलच्या माध्यमातून बीसीसीआय अधिक श्रीमंत होत आहे. पण, बोर्डाला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तोटा सहन करावा लागू शकतो. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ची स्पर्धा पाकिस्तानात होणार असून भारतीय संघ तिथे जाणार नाही हे जवळपास निश्चित आहे. बीसीसीआय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेशी चर्चा करून श्रीलंका किंवा दुबईमध्ये टीम इंडियाचे सामने आयोजित करण्यास सांगू शकते. अशा स्थितीत बीसीसीआयला तोटा सहन करावा लागू शकतो. २००८ च्या आशिया चषकापासून दोन्ही देशांमधील तणावपूर्ण संबंधांमुळे भारताने तेव्हापासून पाकिस्तानमध्ये कोणतीही क्रिकेट स्पर्धा खेळलेली नाही.