मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) 12व्या मोसमाचे संपूर्ण वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे. लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची वाट पाहणारे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) सोमवारी आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याआधी बीसीसीआयने पहिल्या दोन आठवड्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
मे-जून मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेमुळे आयपीएल यंदा मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. 23 मार्च पासून आयपीएल स्पर्धा सुरू होणार असल्याची घोषणा बीसीसीआयने केली होती. आयपीएलच्यावेळी भारतामध्ये निवडणूका होणार आहेत. त्यामुळे आयपीएलचे सामना भारतात होणार की नाही याबाबत साशंकता होती. पण बीसीसीआयचे हंगामी सचिव अमिताभ चौधरी यांनी आयपीएलचे सर्व सामने भारतातच होतील, असे मत व्यक्त केले होते. पण, त्यावेळी त्यांनी वेळापत्रक जाहीर केले नव्हते.
सध्याच्या सरकारचा कार्यकाळ मे महिन्यात संपणार आहे आणि त्यानंतर निवडणूक होतील. 30 मे ते 14 जून या कालावधीत वर्ल्ड कप स्पर्धाही होणार आहेत. त्यामुळे आयपीएलच्या वेळापत्रकाचे नियोजन करण्याची तारेवरची कसरत बीसीसीआयला करावी लागणार आहे. 2009 मध्ये निवडणुकांमुळे संपूर्ण स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आली होती, तर 2014 मध्ये स्पर्धेचा काही टप्पा संयुक्त अरब अमिराती येथे खेळवण्यात आला होता.
पण, यंदा आयपीएल, लोकसभा निवडणूक व वर्ल्ड कप हे एकाच वर्षी आल्या आहेत. '' आयपीएलचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी आम्हाला थोडा वेळ लागेल. निवडणूक आयोगाने लोकसभेच्या तारखा जाहीर केल्यानंतर आम्ही वेळापत्रक जाहीर करू. त्यानंतरच नियोजन करण्यात येईल,'' असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.
आयपीएलमधील 10 महागडे खेळाडू, तुम्हाला माहित आहेत का?
इंडियन प्रीमिअर लीगच्या 2019च्या मोसमासाठी खेळाडूंचा लिलाव मंगळवारी जयपूर येथे झाला. 70 जागांसाठी 346 हून अधिक खेळाडू रिंगणात होते. त्यात सर्वाधिक भाव खाल्ला तो वरुण चक्रवर्ती, जयदेव उनाडकट यांनी. पण आयपीएलच्या इतिहासात सर्वात महागड्या खेळाडूचा मान अजूनही युवराज सिंगच्या नावावर आहे. 2015 मध्ये त्याला दिल्ली डेअरडेव्हिल्स ( सध्याचा दिल्ली कॅपिटल्स) संघाने 16 कोटींत घेतले होते.
आयपीएलमधील दहा महागडे खेळाडू
युवराज सिंग - दिल्ली डेअरडेव्हिल्स 16 कोटी ( 2015)
बेन स्टोक्स - पुणे सनरायजर्स 14.5 कोटी ( 2017)
युवराज सिंग - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 14 कोटी ( 2014)
बेन स्टोक्स - राजस्थान रॉयल्स 12.5 कोटी ( 2018)
दिनेश कार्तिक - दिल्ली डेअरडेव्हिल्स 12.5 कोटी ( 2014)
जयदेव उनाडकट - राजस्थान रॉयल्स 11.5 कोटी ( 2018)
गौतम गंभीर - कोलकाता नाईट रायडर्स 11.4 कोटी ( 2011)
लोकेश राहुल - किंग्ज इलेव्हन पंजाब 11 कोटी ( 2018)
दिनेश कार्तिक - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 10.5 कोटी ( 2015)
रवींद्र जडेजा - चेन्नई सुपर किंग्ज 9.72 कोटी ( 2012)
Web Title: The BCCI is expected to release the full schedule of the IPL in Mumbai on March 18
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.